* कार्यकारी अभियंत्यांना घातला घेराव * मनसेच्या शिष्टमंडळाला सात दिवसांत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
अमोल इंगळे
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोपरखैरणे मधील विविध नागरी समस्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांना शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नवी मुंबई शहर सचिव संदीप गलुगडे यांच्या नेतृत्वाखाली घेराव घातला आणि जाब विचारला. कोपरखैरणे विभागातील उखडलेले पदपथ,रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, बंद अवस्थेत असलेले पथदिवे आणि उद्यानांची दुरावस्था या सर्व प्रश्नांचा पाढाच मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग आणि विद्युत विभागाच्या अधिकार्यांना वाचून दाखवला.
कोपरखैरणे सेक्टर-१९ मधील मनसेचे उपविभाग अध्यक्ष सागर मांडे यांनी सदर परिसरातील उखडलेले पदपथ,उघडी गटारे यांचे निवेदन छायाचित्रांसहित कार्यकारी अभियंता यांना दिले. त्यावर येत्या सात दिवसांच्या आत सर्व दुरुस्तीचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून घेतो असे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसर हा अंधारात असल्याचे व सेक्टर-५,६,७,८ मधील उद्यानांची झालेल्या दुरावस्थेबाबत पुराव्यासह माहिती कोपरखैरणे विभाग अध्यक्ष शरद डिगे यांनी मनपा अधिकार्यांना दिली. सदरचे पथदिवे तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन मनपा अधिकार्यांनी शिष्टमंडळाला दिले व उद्याना संदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे संगितले. सदरची कामे दिलेल्या वेळेत पूर्ण न झाल्यास कार्यकारी अभियंता यांच्या दालनात मनसे स्टाईल खळ-खट्ट्याक आंदोलन करू असा इशारा मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी याप्रसंगी दिला.
याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात शहर सचिव संदीप गलुगडे, कोपरखैरणे विभाग अध्यक्ष शरद डिगे, सुधीर पाटील, लीलाधार घाग, उपविभाग अध्यक्ष सागर मांडे, शिवाजी मुंडकर, आकाश पोतेकर, दत्तात्रय तोडकर, प्रसाद घोरपडे, शाखा अध्यक्ष चंद्रकांत डांगे, घनश्याम चौधरी, शशिकांत साळुंखे, तसेच जनहित कक्षाचे समीर जाधव, वाहतूक सेनेचे महेश कदम, सतीश पडघम, भूषण बारवे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.