अमोल इंगळे
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऐरोली विभागातर्फे रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आज दि.०६ जुलै २०१८ रोजी ऐरोली विभागात अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली सेक्टर-२० येथे पटणी कंपनी समोरील रस्त्यावर खड्ड्यांमध्ये उतरून विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी व कोळी बांधव यांच्यातर्फे प्रतिकात्मक मासे पकडण्यात आले.
यावेळी खड्ड्यांचे मोजमाप देखील मनसे तर्फे करण्यात आले. तसेच यावेळी पडलेल्या खड्यांच्या बाजूला मनसे महिला उपशहर अध्यक्ष शुभांगी बंदीछोडे व महिला कार्यकर्त्यांकडून रांगोळी काढण्यात आली. यावेळी सरकार आणि महापालिकेच्या गलथान कारभाराचा मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून तीव्र निषेध केला.
मुंब्रा बायपास महामार्ग हा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने सर्व अवजड वाहने ही नवी मुंबईतून जात असतात आणि या अवजड वाहनांमुळे नवी मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. शिवाय नवी मुंबई मनपा ही ठेकेदारांना हाताशी धरून बोगस कारभार करतअसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे विभाग अध्यक्ष रूपेश कदम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
येत्या 24 तासात खड्डे न बुजवल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांना खड्ड्यात लोळविण्यात येईल असा इशारा देखील मनसेने प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
याप्रसंगी मनसे उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले, जनहित कक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत महाडिक, वाहतूक सेनेचे शहर चिटणीस जमीर पटेल, विभाग अध्यक्ष रूपेश कदम, नितीन नाईक, धनंजय भोसले, उपविभाग अध्यक्ष प्रवीण घोगरे, शाखा अध्यक्ष रमेश वाघमारे, गौरव महाडिक, दिनकर पागिरे, निखिल थोरात, रूपेश शेवाळे, दशरथ सुरवसे, कय्याम शेख तसेच दिपेश गवांदे, शुभांगी बंदीछोडे, सोनल भुतकी, कल्पना आयरे, शिवानी परदेशी, सौ.मृणाल महाडिक, संगिता पवार, ज्योती खाडे, प्रतिभा तेजम व मोठ्या संख्येने उपस्थित होते.