निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची मागणी
नवी मुंबई:- नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करावी तसेच सदर खड्डेमय रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण व काँक्रीटीकरण करणेबाबत बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.श्री. प्रवीण पोटे यांजकडे मागणी केली.
नवी मुंबई सारख्या विकसित अशा शहरातील सायन पनवेल महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असून अशा खड्डयांमुळे वाहनांना हादरे बसून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सदरबाबत गतवर्षी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्यमंत्री महोदयांनी सदर खड्डेमय व खराब रस्त्यांचा पाहणी दौरा करून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना रस्त्यांतील खड्डे बुजवून डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्याचे आदेश दिले होते. सदरबाबत कार्यवाही सुद्धा केली गेली. परंतु सदर कामास 1 वर्षही पूर्ण झाले नसताना सायन-पनवेल महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य पसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सायन-पनवेल महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्याची मागणी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे पाटील यांच्याकडे केली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे पाटील यांनीही सदरबाबत कंत्राटदाराने केलेल्या चुकीच्या कामांमुळे दोषींवर कारवाई करण्यात येईल तसेच पी.डब्ल्यू.डी. च्या अधिकाऱ्यांना संपूर्ण खड्डे बुजवून डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्याचे आदेश दिले. लवकरच आपल्याला खड्डेमय नवी मुंबई पाहायला मिळणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.