नवी मुंबई : नवी मुंबईतील दशनाम गोसावी समाजासाठी समामंदिर उभे राहणे आवश्यक असून त्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही लोकनेते गणेश नाईक यांनी दिली आहे.
नवी मुंबई दशनाम गोसावी समाज आणि गोसावी रुद्राक्ष त्रैमासिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी समाजाचे स्नेहसंमेलन, विद्यार्थी व विशेष प्राविण्य मिळविलेल्या समाज बांधवांचा सत्कार सोहळा पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते नाईक बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, नवी मुंबई दशनाम गोसावी समाज संघटनेने अध्यक्ष डॉ. सोमनाथ गोसावी, रुद्राक्ष मासिकाचे संपादक ए. जी. गोसावी, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नवी मुंबई पालिकेतील पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, नवी मुंबई परिवहन समितीचे सदस्य राजू शिंदे, निवृत्त अधिक्षक शिवाजी गोसावी, माजी उपायुक्त वसंत गोसावी, नगरसेवक दत्ता गिरी, सुरेंद्र गिरी, ऍड. विलास गोसावी, डॉ. कैलाश गोसावी, डॉ.रविंद्र गोसावी, कल्पना भारती, नायब तहसिलदार भिमराज गोसावी, दलित मित्र जितेंद्र गोस्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.सोमनाथ गोसावी यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेताना आत्तापर्यंत दोन समाधीस्थळांसाठी जागा प्राप्त करुन घेतल्याची माहिती दिली. या कामात लोकनेते गणेश नाईक आणि डॉ. संजीव नाईक यांचे सहकार्य लाभल्याचा आवर्जून उल्लेख केला. समाजासाठी एक समाजमंदिर उभारण्याचे स्वप्न असून त्या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. लोकनेते नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. गोसावी समाजासाठी नि:स्पृहपणे करीत असलेल्या कार्याचा गौरव करतानाच गोसावी समाजाच्या समाजमंदिरासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही दिली.रुद्राक्ष मासिकाचे संपादक ए. जी. गोसावी यांनी मासिकाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम होत असल्याचे नमूद केले. तर समाजावरील अन्यायाला पायबंद घालायचा असेल तर एकत्र होण्याची गरज डॉ. नाथ यांनी याप्रसंगी व्यक्त केली.