चिपळूण : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने मराठी माणसांसाठी काहीही केलेले नाही. शिवसेना नेत्यांची बिल्डरांशी पार्टनरशिप असून यातून शिवसेनेला मिळणाऱ्या टक्केवारीमुळेच मराठी माणसाची अधोगती झाली, असा आरोप नारायण राणे यांनी केला.
चिपळूण येथील माटे सभागृहात बुधवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेने मराठी तरुणांना नोक-या देण्यासाठी काहीही केलेले नाही. उच्चशिक्षण घेऊनही मराठी तरुण बेरोजगार आहे. शिवसेनेमुळे मुंबईतील मराठी माणूस खालसा झाला. मी शिवसेना सोडली याचे कारण सर्वांनाच माहित आहे. मुंबईतील गिरण्या बंद झाल्या. त्या गिरण्यांच्या जमिनी बड्या बिल्डरांना विकल्या गेल्या. त्या बिल्डरांच्या बरोबर शिवसेना नेत्यांची पार्टनरशिप आहे. मातोश्री ही पार्टनर आहे. यात शिवसेनेने जी टक्केवारी घेतली आणि त्यामुळेच मराठी माणसाची अधोगती झाली, असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेला फक्त पैसा कमविणे आणि सत्ता मिळवणे इतकंच कळतं. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता एवढेच त्यांचे गणित असते. शिवसेनेने दहा ते बारा वेळा सत्ता सोडू अशी घोषणा केली. परंतु त्यांनी सत्ता सोडली नाही. ते अजूनही सत्तेला चिकटून बसले आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्प रद्द होण्यासाठी शिवसेना सत्ता सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
नाणार प्रकल्प कोणी आणला? या प्रकल्पासाठी सुरुवातीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पण आम्ही विरोध केल्यावर शिवसेनेला जाग आली, असंही त्यांनी नमूद केले. कोकण उद्ध्वस्त होऊ नये म्हणूनच आम्ही नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला. शिवसेना नेते सत्तेत आहेत. पण नाणारविरोधात ते सत्तेचा त्याग करत नाही. फक्त सत्ता सोडतो असे सांगतात, असा टोलाही त्यांनी लगावला.