नवी दिल्ली : ‘आरक्षण दिलं तरी काही काहीच फायदा होणार नाही. आरक्षण मिळालं तरी नोकऱ्या आहेत कुठे?’, असं विधान केल्यानं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी अडचणीत आले आहेत. या विधानावर सारवासारव करून त्यांनी हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी या विधानावरून गडकरींना सवाल करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
‘देशात नोकऱ्याच शिल्लक राहिलेल्या नाहीत, तर लोकांना आरक्षण हवंय तरी कशासाठी?’ असा सवाल नितीन गडकरी यांनी केला होता. त्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करत गडकरींना घेरले आहे. ‘तेच म्हणतोय. संपूर्ण देशच विचारतोय नोकऱ्या आहेत कुठे? स्मार्ट प्रश्न विचारलात गडकरीजी’, असा टोला राहुल यांनी गडकरींना लगावला आहे.
‘बँकात माहिती तंत्रज्ञान आल्याने नोकऱ्या कमी झाल्या आहेत. सरकारी नोकरभरती बंद आहे. नोकऱ्या आहेत कुठे?’, असा सवाल गडकरी यांनी केला होता. ‘गरीब गरीब असतो. त्याला जात आणि धर्म नसतो. पंथ आणि भाषाही नसते. हिंदू, मुस्लिम कोणत्याही धर्माचा असो प्रत्येकाला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळालाच पाहिजे, असा एक विचार सांगतो. ते त्यांना द्यायलाच हवं’, असं सांगत गडकरींनी अप्रत्यक्षपणे आर्थिक निकषावर आरक्षण देण्यावर जोर दिला. दरम्यान, गडकरींच्या या विधानावरून गदारोळ निर्माण झाल्यानतंर त्यांनी घाईघाईत ट्विट करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘आरक्षण धोरणात बदल करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही’, असं गडकरींनी स्पष्ट केलं.