शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप
मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई करताना भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले. या चौघांमध्ये एका मेजरचा आणि तीन जवानांचा समावेश आहे. या घटनेवरून शिवसेनेने भाजपावर निशाला साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आल्यापासून म्हणजेच मागील चार वर्षांपासून जेवढे जवान सीमेवर मारले गेले तेवढे मागच्या ५० वर्षातही मारले गेले नाहीत असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जवान शहीद झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्यानंतर शिवसेनेने मोदींवर निशाणा साधला आहे.
पाकिस्तानमधून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली होती. गुरेज सेक्टरला लागून असणाऱ्या नियंत्रण रेषेवर जवान गस्त घालत असताना आठ दहशतवादी घुसखोरी करत असल्याचं दिसलं. जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं असता दहशतवाद्यांना गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिलं. चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं असून इतर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. अशात आता शिवसेनेने याच मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.