सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत राखाडी धुण्यासाठी सारसोळेच्या ग्रामस्थांना पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २-४ परिसरात शांतीधाम सारसोळे स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमध्ये सारसोळे गावासह नेरूळ पश्चिम व जुईनगर आणि शिरवणे येथून मृतदेह अंत्यविधीसाठी आणले जातात. ग्रामस्थांमध्ये अंत्यविधीच्याच ठिकाणी राखाडी धुण्याचपध्दत आहे. अंत्यविधी झाल्यावर ग्रामस्थांना राखाडी धुण्यासाठी लांबून पाणी अंत्यविधी झाला, त्या ठिकाणी आणावे लागते. सारसोळे स्मशानभूमीतील पहिल्या दोन अंत्यविधीच्या जागा सारसोळेच्या ग्रामस्थांसाठी राखीव आहे. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने पाण्याचा नळ उपलब्ध करून दिल्यास राखाडी धुण्यासाठी शोकाकूल ग्रामस्थांना लांबवरून पाणी वाहून आणावे लागणार नाही. नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी ग्रामस्थांनी आपल्या शेत जमिनी दिल्या आहेत. त्यांना शेतीच्या माध्यमातून मिळणार्या उपजिविकेवर कायमस्वरूपी पाणी सोडले आहे. त्यांचे योगदान व त्याग नवी मुंबईकर कदापि विसरणार नाही. अंत्यविधीच्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीच्या ठिकाणी राखाडी धुण्यासाठी पाण्याचे नळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.