नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांप्रमाणेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार पाणीबचतीच्या दृष्टीने अनधिकृत नळजोडण्यांवरही धडक कारवाई करण्यात येत असून परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली कोपरखैरणे परिसरात काही इमारतींच्या अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.
कोपरखैरणे सेक्टर 12 बी येथील माऊलीकृपा अपा., वरदविनायक अपा., प्रगती व्हिला या 3 ठिकाणी तसेच रामनगर, सेक्टर 12 डी खैरणे येथील जयहिंद निवास मध्ये नशिहा सय्यद आणि अजमेमुरालनिसा खान यांच्याकडील अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे हनुमाननगर मधील बबन कोरडे व कविता माखरे यांच्या येथील अनधिकृत नळजोडण्या विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचारीवृंदाने खंडीत केल्या. यापुढील काळात सर्वच विभागात ही कारवाई प्रभावीपणे राबविली जाणार आहे.