मुंबई : गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून एका व्यक्तिने मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना ५०० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. या व्यक्तिने लोकांना पाच वर्षात दुप्पट, सात वर्षात तीनपट आणि १० वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या या आमिषाला बळी पडत तीन लाख लोकांनी त्याच्याकडे पैसे जमा केले होते. पोलिसांना या चिटफंड घोटाळ्याची माहिती मिळेपर्यंत त्याने तीन लाख लोकांना ५०० कोटी रुपयांना लुबाडले होते. हा चिटफंड घोटाळा अथर्व फॉर यू इन्फ्रा एण्ड एग्रो प्राव्हेट लिमिटेडने केलेल्या हेराफेरीचा आहे. याचा तपास महाराष्ट्र आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. पाच लाख लोकांना चुना लावणाऱ्या व्यक्तीचे नाव गणेश हजारे आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात त्याला ठाण्यातून ताब्यात घेतले होते.
महाराष्ट्र आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये गणेशने पाँझी स्कीम (चिटफंड घोटाळा)द्वारे ५०० कोटी रूपये हडप केले असल्याचे उघड झाले आहे. गेल्या आठवड्यात या घोटाळ्यासंबधी पहिली अटक झाली होती. पाँझी स्कीममध्ये गुंतवणूक केलेल्या काही गुंतवणूकदारांनी गणेशला ठाण्यातील तलाव पालीमध्ये भेटण्यास बोलवले होते. त्यावेळीच पोलिसांनी धाड टाकत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हजारेचे शिक्षण फक्त बारावीपर्यंत झाले आहे. गणेशला काल कोर्टाने १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गेल्या आठवड्यात या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास आणखी वेगाने केला. गणेश व्यतिरिक्त या चिटफंड घोटाळ्यामध्ये शिवाजी निफडे, सचिन गोसावी आणि मुकेश सुदेश यांची नावे आहेत. पोलिसांनी या चार जणांची ३० बँक खाती गोठवली आहेत. त्याशिवाय ठाणे, दादर, बोरिवली येथील कार्यालये आणि दहिसर, वाशी, ठाणे, शहापूर, पालघरसह अन्य ठिकाणांवरील फ्लॅटना टाळे ठोकले आहेत.