नवी मुंबई : शहरातील विविध सुविधांकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे बारकाईने लक्ष असून विविध विभागांतील आवश्यक नागरी सुविधा कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे. या अनुषंगाने सानपाडा विभागात सेक्टर 13, सेक्टर 16 ए व सेक्टर 20 येथील त्याचप्रमाणे सेक्टर 30 येथील रस्ता, पावसाळी गटारे व पदपथाची सुधारणा कामे हाती घेण्यात येत आहेत.
सानपाडा सेक्टर 13 येथे मोराज सिग्नल ते मोराज सर्कल पर्यंत दोन्ही बाजूस तसेच सेक्टर 16 ए येथील महिला वसतीगृह व सेक्टर 20 येथील मलनि:स्सारण केंद्रासमोर पावसाळी ड्रेन नाहीत. त्याचप्रमाणे मोराज सिग्नल ते मोराज सर्कलपर्यंतचा आणि सेक्टर 16 ए येथील महिला वसतीगृहासमोरचा रस्ता खराब झालेला आहे. याठिकाणी पावसाळी ड्रेन केल्याने पावसाळी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल आणि रस्त्याची सुधारणा केल्याने नागरिकांची गैरसोय दूर होईल. तसेच ही कामे करताना याठिकाणी आर.सी.सी.डक्टची सुविधा उपलब्ध करून दिल्यास विविध संस्थांना त्यांच्या केबल्स टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करावे लागणार नाही व भविष्यात त्यांची देखभाल वा दुरूस्ती करताना नागरी सुविधांना अडथळा येणार नाही. या सर्व बाबी विचारात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी साधारणत: 2 कोटी 78 लक्ष रक्कमेच्या या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या प्रस्तावित सुविधा कामास मान्यता दिली असून स्थायी समितीच्या मान्यतेनंतर हे काम सुरू करण्यात येईल.
अशाचप्रकारे सेक्टर 30 सानपाडा येथील मुख्य व अंतर्गत पावसाळी ड्रेन हे सिडकोकालीन प्रिकास्ट स्वरूपाचे असून हे गटारावरील प्रिकास्ट स्लॅब कमकुवत व नादुरूस्त झाले आहेत. हे जुने कमकुवत स्लॅब तोडून त्यांचे अँकरींग केल्यास हे स्लॅब तुटणे बंद होतील. त्याचप्रमाणे सायन पनवेल हायवे ते सानपाडा स्टेशन व चिराग हॉटेल ते केशवकुंज 1 या रस्त्यावर आर.सी.सी. डक्टची सुविधा केल्यास विविध संस्थांना त्यांच्या केबल्स टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करावे लागणार नाही व त्यांची भविष्यातील देखभाल नागरी सुविधांना अडथळा न आणता करता येईल. तसेच रस्त्यालगत असलेल्या पदपथाची सुधारणा करून नागरिकांना चालण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल. या कामांसोबत सायन पनवेल हायवे ते सानपाडा रेल्वे स्टेशन, फॅन्टासिया मॉल ते सानपाडा रेल्वे स्टेशन व चिराग हॉटेल पर्यंत आणि पुढारी प्रेस परिसर या ठिकाणची रस्ता सुधारणा कामे करणे प्रस्तावित आहेत. या रस्ता सुधारणेमुळे वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल. अशाप्रकारे सेक्टर 30 परिसरातील पावसाळी ड्रेन, रस्ते, पदपथ सुधारणा कामांची आवश्यकता लक्षात घेऊन ही कामे करण्यास महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मान्यता लाभली असून साधारणत: 2 कोटी 31 लक्ष रक्कमेच्या या कामांस स्थायी समितीची मान्यता लाभल्यानंतर सुरूवात होणार आहे. या सुविधा कामांमुळे सानपाडा परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.