मुंबई – ‘अति घाई संकटात नेई’ असा संदेश देत वाहतूक पोलिसांकडून वेगमर्यादेचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येते. मात्र ‘अतिघाईमुळे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संकटात आले आहेत. मुख्यमंत्री वापरत असलेल्या वाहनांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलानच्या माध्यमातून एकूण १३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, हा दंड अद्याप ‘पेंडिंग’ असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी केलेल्या दाव्यानुसार, जानेवारी ते मे २०१८ या काळात मुख्यमंत्र्यांच्या वाहन क्रमांक एमएच-०१-सीपी-००३७ आणि एमएच-०१-सीपी-००३८ या दोन्ही वाहनांवर वांद्रे-वरळी सागरी सेतूवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलानच्या माध्यमाने दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वाहनचालकांकडून दंडाची रक्कम कोण वसूल करणार? मुंबई पोलीस ट्रॅफिक अॅपनुसार आतापर्यंत दंडाची १३ हजार रुपयांची रक्कम ‘पेंडिंग’ आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर दंडाची थकबाकी भरत नाहीत, तर सामान्य जनतेने तरी तो का भरायचा, असा सवाल उपस्थित करत थकबाकीच्या वसुलीसाठी ठोस कारवाई करण्याची मागणी अहमद यांनी केली.
पोलिसांची ‘चुप्पी’
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माहितीनुसार, २२ डिसेंबर २०१६ रोजी ‘एमएच-०१-सीपी-००३८’ या क्रमांकाचे वाहन भायखळा पोलीस उपायुक्त यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
एमटीपी अॅपनुसार, या वाहन क्रमांकांच्या वाहनचालकाने तब्बल ८ वेळा वांद्रे-वरळी सेतूवर वेगमर्यादेचे उल्लंघन केले. याबाबत मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असता ‘आॅन रेकॉर्ड’ बोलण्यास अधिकारी तयार नाहीत.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरात तब्बल ४ हजारांहून जास्त सीसीटीव्हींचे जाळे उभारले आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूसह शहरातील मुख्य रस्त्यांचा समावेश या सीसीटीव्हींमध्ये आहे. एकीकडे रस्ता सुरक्षा सप्ताहाबाबत उपाय राबवायचे आणि दुसरीकडे राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींकडून रस्ता सुरक्षेची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट होत आहे.