ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने पराभवासाठी आम्ही पात्र होतो असे म्हटले आहे. रविवारी लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडने भारताचा एक डाव आणि १५९ धावांनी मानहानीकारक पराभव करत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने पराभवासाठी आम्ही पात्र होतो असे म्हटले आहे.
यावेळी कोहलीने संघ निवडीत चूक झाल्याचीही कबुली दिली. वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी कुलदीप यादवला खेळवण्याचा निर्णय चुकल्याचे विराटने कबुल केले. पराभवानंतर पाठिमागे वळून पाहताना संघ निवडीत आम्ही चुकलो असे मला वाटते. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो ते निश्चित अभिमानास्पद नाही. आम्ही पराभवासाठी पात्र होतो असे कोहलीने सांगितले.
या कसोटीत भारताचा पहिला डाव अवघ्या १०७ धावात आटोपला. त्यानंतर इंग्लंडकडे २८९ धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त १३० धावाच करु शकला. पावसाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर कोहली म्हणाला कि, वातावरणाला जबाबदार धरता येणार नाही. मैदानावर इंग्लिश संघाने सरस खेळ केला त्यामुळे ते विजयासाठी पात्र होते असे कोहली म्हणाला.
बर्मिंगहॅम कसोटीपाठोपाठ भारतीय संघाला ऐतिहासीक लॉर्ड्सच्या मैदानावरही पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लिश गोलंदाजांच्या तोफखान्याला तोंड देताना भारतीय संघाच्या अक्षरशः नाकीनऊ आले. दुसऱ्या डावातही भारताचे फलंदाज जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सच्या माऱ्यासमोर पुरते ढेपाळले. हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन आश्विन यांच्यात झालेल्या अर्धशतकी भागीदारीचा अपवाद वगळता एकही फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही. दोन्ही डावांमध्ये भारतीय सलामीवीरांनी निराशाजनक कामगिरी केली. याचसोबत विराट कोहलीही या सामन्यात आपली छाप पाडू शकला नाही. मात्र दुसरीकडे इंग्लंडच्या गोलंदाजांनी हवामानाचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवली.