कोलकाता- ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना १० ऑगस्ट रोजी उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. याच वर्षी जून महिन्यांत सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वर्ष २०१४ मध्येही त्यांना असाच त्रास जाणवला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. संसदीय प्रणालीतील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले आहे. १४ व्या लोकसभेत ते पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र होते
चॅटर्जी यांनी नुकतीच पंचायत निवडणुकांवरून राज्य निवडणूक आयोगावर टीका केली होती. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत पश्चिम बंगालच्या निवडणुकीत इतका हिंसाचार पाहिला नसल्याचे त्यांनी म्हटले होते. दहा वेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व केलेले चॅटर्जी यांनी १९६८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. १९७१ मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते.
सोमनाथ चॅटर्जी यांना १९९६ साली उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००४ ते २००९ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते. २००८ मध्ये सोमनाथ चॅटर्जी यांनी पक्षादेश मानण्यास नकार दिला त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. सीपीएमने त्यावेळी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर चॅटर्जी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.