भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. पण मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना यश आले नाही. राहुल ३५ तर शिखर धवन ४४ धावांवर तंबूत परतला. सध्या चेतेश्वर पुजारा ३३ तर कर्णधार विराट कोहली ८ धावांवर खेळत आहेत. त्याआधी पहिल्या डावात भारताला ३२९ धावा करता आल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव केवळ १६१ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. या डावात हार्दीक पांड्याने २८ धावा देऊन ५ बळी टिपले. जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या. हार्दिकच्या या कामगिरीमुळे भारताला दुसऱ्या दिवसअखेरीस २९२ धावांची भक्कम आघाडी घेता आली आहे.
आज सामन्याचा दुसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव केवळ १६१ धावांत गुंडाळला. उपहारापर्यंत इंग्लंडने संयमी खेळ करत बिनबाद ४६ धावांपर्यंत मजल मारली होती. कूक आणि जेनिंग्स जोडीने भारतीय गोलंदाजांचे आक्रमण परतावून लावत अर्धशतकाकडे वाटचाल केली. पण उपहारानंतर कूक (२९) आणि जेनिंग्स (२०) दोघेही बाद झाले. पुढे इंग्लंडच्या डावाला स्थैर्य मिळत असल्याचे वाटत असतानाच नवोदित ओली पोप बाद झाला. ऋषभ पंत याने डावातील तिसरा झेल टिपला. इशांत शर्माने त्याला बाद केले. त्या नंतर हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांचे धाबे दणाणले. जो रूट (१६), जॉनी बेअरस्टो (१५), ख्रिस वोक्स (८), आदिल रशीद (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) या पाच फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. तर दुसरीकडे मोहम्मद शमीने बेन स्टोक्स (१०)चा काटा काढला. जोस बटलर याने काही काळ झुंज दिली. पण फटके मारण्याच्या नादात तो देखील सर्वाधिक ३९ धावा करून बाद झाला. त्यामुळे भारताकडे आता १६८ धावांची आघाडी आहे. हार्दिक पांड्याने केवळ २८ धावांत ५ बळी टिपले, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी २ तर मोहम्मद शमीने १ बळी टिपला.
आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या ऋषभ पंतने पाच झेल टिपले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा यष्टीरक्षक ठरला.
त्याआधी ६ बाद ३०७ धावसंख्येवरून भारताच्या फलंदाजांनी डाव पुढे सुरू केला. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला सातवा धक्का बसला. नवोदित ऋषभ पंत २४ धावा करून माघारी परतला. स्टुअर्ट ब्रॉडने त्याचा त्रिफळा उडवला. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर पाठोपाठ अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा तिघेही झटपट बाद झाले. एकूण ४ पैकी ब्रॉड आणि अँडरसन दोघांनी २-२ बळी टिपले. त्यामुळे केवळ २२ धावांची भर घालून भारताचा डाव संपुष्टात आला. विराट-अजिंक्य वगळता भारताचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. डावाच्या सुरूवातीला भारताचे पहिले तीन बळी लवकर बाद झाले होते. पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने इंग्लिश गोलंदाजांची पुरेपूर धुलाई केली. विराटने ९७ तर अजिंक्यने ८१ धावा काढत भारताला मजबूत स्थितीत आणले होते. पण पुढील फलंदाजांनी मात्र निराशा केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले, तर आदिल रशीदने १ गडी बाद केला.