* मुलुंड ऐरोली टोलच्या धर्तीवर मनसेने केली मागणी* मागणी मान्य न झाल्यास खळखट्ट्याक
अमोल इंगळे
नवी मुंबई : मुंबई मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीमुळे ठाणे, मुलुंड, आणि ऐरोली मार्गावर होणार्या वाहतूक कोंडीमुळे जनक्षोब उसळू लागल्याने कुंभकरणीय झोपेत असणार्या सेना भाजप सरकारला अखेरीस नमते घेऊन ऐरोली तसेच मुलुंड टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना महिन्याभरासाठी टोलमाफी जाहीर करावी लागली. याच धर्तीवर सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल देखील महिन्याभरासाठी टोल मुक्त करण्याची मागणी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सायन पनवेल महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून,दररोज यामुळे वाहतूक कोंडीला लोकांना सामोरे जावे लागते. येत्या आठवड्याभरत सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका महिन्याभरासाठी टोलमुक्त न केल्यास नवी मुंबई मनसे खळखट्ट्याक ने याला उत्तर देईल असा इशारा शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सेना भाजप सरकारला प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
सुमारे १२२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन पनवेल महामार्ग हा सध्या सर्वसामान्य करदात्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. शुक्रवार दि.१३ जुलैला सायन पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे सनी विश्वकर्मा आणि कमलेश यादव या दोघांचा अंधारात खड्डे न दिसल्यामुळे अपघात झाला. त्यामध्ये सनी विश्वकर्मा याचा जागीच मृत्यू झाला तर कमलेश जबर जखमी झाला. दि.०५ जुलैला उरण फाटा येथे इब्राहीम खुर्शीद यांचा खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचे जीव जाणे हे अत्यंत गंभीर असल्याचे मनसे उपशहर अध्यक्ष नितिन चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
त्यातच मुंबई मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहनचालक सध्या सायन पनवेल महामार्गाचा जास्त वापर करत आहेत. यामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच या महामार्गावरील खड्डे वाहतूक कोंढी होण्यास करणीभूत ठरत आहेत.
येत्या सात दिवसांच्या आत सरकारने सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोलनाका देखील मुलुंड ऐरोली टोलच्या धर्तीवर महिन्याभरासाठी टोलमुक्त करावा अन्यथा वाशी टोलनाक्यावर नवी मुंबई मनसे खळखट्ट्याक करेल असा जाहीर इशारा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.