मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी रोजी मुंबईत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी चार वाजता अटलजींचा अस्थी कलश मुंबईत विमानतळावर आणण्यात येईल. त्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे नवी दिल्ली येथून अटलजींचा अस्थी कलश मुंबईत आणणार असून राज्यातील विविध नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिली. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रवक्ते गणेश हाके व अतुल शाह उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत नरिमन पॉइंट येथे एनसीपीए सभागृहात सायंकाळी ६ वाजता सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह नेते अटलजींविषयीच्या भावना व्यक्त करतील. विविध क्षेत्रातील मान्यवरही सभेत सहभागी होतील. मुंबईतील राज्यस्तरीय सभेप्रमाणे राज्यात विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील विविध नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड व सांगली येथे नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येईल. मुंबईत श्रद्धांजली सभास्थानी अस्थी कलश हस्तांतरित करण्यात येतील. अटलजींचा अस्थी कलश विसर्जनासाठी घेऊन जात असताना नागरिक व कार्यकर्ते वाटेत ठिकठिकाणी पुष्पांजली अर्पण करतील. अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.