अमोल इंगळे
नवी मुंबईः हिरानंदानी फोर्टीज रुग्णालय व्यवस्थापन वाशी येथील रुग्णालय मणिपाल युनिव्हर्सिटीला विकण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक बाब स्थायी समिती सदस्य व कोपरखैरणेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामींच्या नजरेस आणून दिली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याबाबत हिरानंदानी फोर्टीजचे समभाग ट्रान्सफर न करण्याबाबत सेबी यांना पत्र पाठविल्याचे सांगून हिरानंदानीलाही कायदेशीर नोटीस देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे हिरानंदानी-फोर्टीजच्या मुसक्या आवळल्या गेल्याची चर्चा नवी मुंबई महापालिका मुख्यालयात सुरू आहे. गत स्थायी समिती बैठकीत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील यांना वाशीतील हिरानंदानी फोर्टीजच्या समभाग हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित करुन हिरानंदानी हॉस्पीटल महापालिकेने संदर्भीत करावयाच्या मंजुरीपेक्षाही कमी रुग्णांना सेवा देत असल्याचे त्यांनी महापालिका आयुक्तांच्या नजरेस आणून दिले. हिरानंदानी-फोर्टीज रुग्णालय प्रशासन सातत्याने नगरसेवकांचा यथोचित मान ठेवत नसल्याचे सांगत संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणीही शिवराम पाटील यांनी केली.
यावेळी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मंजूर खाटांच्या १५ टक्के जागा रुग्णालय प्रशासनाने ठेवल्या असून कराराप्रमाणे ते महापालिकेने पाठवलेल्या रुग्णांना सेवा देत असल्याचे सांगितले. तसेच करारानुसार ८०० रुग्णांवर उपचार करणे जरी बंधनकारक असले तरी जास्तीत जास्त वर्षाला ६०० रुग्णांवर उपचार होत असल्याचे सांगून रुग्णालय प्रशासन रुग्णांना आवश्यकतेपेक्षा जास्त दिवस ऍडमिट करुन घेते का? याचा तपास करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर १५ टक्के खाटांव्यतिरिक्त अजून ५ खाटा रुग्णालयात टाकता येतील का? याची चाचपणी सुरु असल्याचे सांगत हिरानंदानी-फोर्टीज त्यांचे भागभांडवल मणिपाल युनिव्हर्सिटीला हस्तांतरीत करीत असल्याचे कळले असल्याचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत आपण अतिशय सावध असून समभाग हस्तांतरण न करण्याबाबत सेबीला पत्र पाठविल्याचे आयुक्तांनी सांगितले. शिवाय आपण विधी विभागामार्फत हिरानंदानी-फोर्टीज प्रशासनाला कायदेशीर समज देणार असल्याचे सांगितले. यापूर्वी हिरानंदानीने असेच समभागाचे हस्तांतरण फोर्टीज ग्रुपला केले होते. आयुक्तांच्या या तत्परतेमुळे हिरानंदानी-फोर्टीजचे हात बांधले गेले असून महापालिकेच्या मंजुरीशिवाय हस्तांतरण शक्य नसल्याचे बोलले जात आहे.
हिरानंदानी-फोर्टीज रूग्णालय नवी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना फारसे जुमानत नसल्याची ओरड गेल्या काही वर्षात महासभा व स्थायी समितीच्या कामकाजादरम्यान नगरसेवकांकडून केली जात आहे.