नवी मुंबई : चाळण झालेल्या खडडेमय पटणी रस्त्याची लवकरच दुरुस्ती होणार आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांची डागडुजी करावी, अशी लेखी मागणी आमदार संदीप नाईक यांनी महापौर जयवंत सुतार आणि पालिका आयुक्त डॉ रामास्वामी एन. यांच्याकडे केली होती. बुधवारी आमदार नाईक आणि महापौर सुतार यांनी पटणी रोडची पाहणी केली. या पाहणीप्रसंगी महापौरांनी लगेचच पालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील अधिकार्यांना तातडीने रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्याचे आदेश दिले. या पाहणीदौर्याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऐरोली तालुकाध्यक्ष अशोक पाटील तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंब्रा बाहयवळण रस्ता दुरुस्तीसाठी बंद असल्याने पटणी मार्गावरुन जड व हलक्या वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. सुमारे १८ हजार जड आणि लाखो हलकी वाहने पटणी मार्गावरुन रोज धावत असल्याने या रस्त्यावर प्रचंड खडडे पडले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. नवी मुंबईकरांच्या सोयीसाठी हा रस्ता पालिकेने दुरुस्त करावा. जास्तीचे मनुष्यबळ, यंत्रणा लावून हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली होती. त्यावर महापौर सुतार यांनी प्रथम या रस्त्याची दुरुस्ती आणि नंतर शहरातील इतर रस्त्यांप्रमाणे कॉंक्रीटीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पालिका अधिकार्यांना दिले आहेत. एमआयडीसीने हा रस्ता जरी बांधला असला तरी त्याचे कल्व्हर्ट जुने झाले आहेत. या रस्त्याचे नव्याने बांधकाम करताना वाढीव वाहतुकीसाठी हा रस्ता सक्षम करण्याची सुचना आमदार नाईक यांनी केली आहे.
ऐरोली गणेशमुर्ती विसर्जन घाट स्वच्छ होणार
ऐरोली गणेशमुर्ती विसर्जन घाटावर मोठया प्रमाणावर गाळ साचला आहे. ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी हा विषय पालिकेच्या महासभेत चर्चेला घेतला होता. गणेशोत्सवापूर्वी या विसर्जन घाटाची स्वच्छता करण्याची मागणी देखील आमदार संदीप नाईक यांनी केली होती. त्यानुसार या विसर्जन घाटाची साफसफाई पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.