इंटकच्या पाठपुराव्यामुळे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय
नवी मुंबई : अनेक वर्षानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनामध्ये आरोग्य व अग्निशमन विभागात ४४८ जागांची प्रथमच मेगाभरती काढण्यात आली आहे. कंत्राटी सेवेचे सर्वत्र निर्मूलन होत असले तरी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील विविध खात्यात आजही कंत्राटी कामगार काम करत आहेत. या भरती प्रक्रियेत वर्षानुवर्षे कायम सेवेच्या आशेने काम करणाऱ्या, परंतु वयोमर्यादा ओंलाडलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे यासाठी नवी मुंबई इंटकच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या दालनात बुधवारी धडक देण्यात आली. यावेळी आयुक्तांनी ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत सामावून घेताना त्यांच्याबाबतीत वयाची अट शिथिल करण्याचे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी मान्य केले आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून अग्निशमन विभागाकरीता विभागीय अग्निशमन अधिकारी (१ पद), अग्निशमन केंद्र अधिकारी (२ पदे), अग्निशमन प्रणेता (१० पदे), अग्निशामक (२०८ पदे ) , वाहनचालक (३९ पदे) त्याचप्रमाणे आरोग्य विभाकरीता स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ (१३० पदे), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (४ पदे), इ.सी.जी. तंत्रज्ञान (७ पदे), रक्तपेढी तंत्रज्ञान (३ पदे), ऑक्झिलरी नर्स / मिडवाईफ (३२ पदे), शस्त्रक्रिया गृह सहायक (१२ पदे) अशी विविध संवर्गातील ४४८ पदे भरण्यात येणार असून या पदांची शैक्षणिक अर्हता प्राप्त करणाऱ्या व नमूद अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महापालिका प्रशासनाकडून भरती प्रक्रियेत यापूर्वी ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा बाद झाल्याने विचार करण्यात आला नव्हता. परंतु हे कामगार पालिका सेवेत काम करत आहेत, त्यांना आरोग्य सेवेचा प्रत्यक्ष अनुभव आहे. कायम सेवेच्या आशेने त्यांनी आपले आयुष्य पालिका सेवेत घालविले आहे. त्यामुळे या भरतीप्रक्रियेत संबंधित ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सामवून घेण्याची आग्रही मागणी इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्याकडे चर्चेदरम्यान केली.
इंटकने आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेवेळी आरोग्य विभागातील सहाय्यक परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांनाही सोबत नेल्याने त्यांनाही आपल्या व्यथा आयुक्तांसमोर मांडता आल्या. महापालिका आयुक्तांनी चर्चेमध्ये भरतीप्रक्रियेत ठोक मानधनावरील कामगारांना न्याय देताना त्यांचे वय काही प्रमाणात शिथील करण्याचे मान्य केले.
भरती प्रक्रियेत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे वय शिथील करण्यास आयुक्तांनी मान्य केल्यामुळे आता या कामगारांचे कायम सेवेचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची प्रतिक्रिया इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.