कामिनी पेडणेकर
मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमतीबाबत पत्रकार परिषदेत केलेले वादग्रस्त वक्तव्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना चांगलाच चटका बसला आहे. त्यांच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध झाल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काय आहेत, याने आपल्याला काहीही फरक पडत नाही. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. ’मंत्री असल्याने पेट्रोल आणि दरवाढीचा फटका बसलेला नाही. कारण मला सगळेच मोफत मिळते. त्यामुळे मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले होते.
इंधन दरवाढीबाबत उपस्थित करण्यात आलेला प्रश्न हा माझ्या व्यक्तिगत स्तरावर विचारला होता. मात्र इंधन दरवाढीबाबत जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल जेथे थेट विचारले जाते तेथे माझे उत्तर हे इंधन दरवाढ रद्द करावे असेच असते. तसेच सामान्य जनतेची जी मागणी असते तीच मागणी रिपब्लिकन पक्ष करीत आला असून, आपण ही सदैव सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आलेलो आहोत असे स्पष्टीकरण आठवले यांनी केले आहे. इंधन दरवाढ हा गंभीर विषय आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना इंधन दरवाढ कमी करण्याबाबत विनंती केली आहे. इंधन दरवाढ प्रश्नांवर मी केलेले वक्तव्य कुणाच्या भावना दुखविणारे ठरले असल्यास त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे स्पष्टीकरण आठवले यांनी दिले आहे. तसेच आठवलेंनी जनतेची माफी मागत वादावर पडदा टाकला आहे.
जयपूर येथे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत इंधन दरवाढीच्या प्रश्नावर पत्रकारांना उत्तर देताना केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे. या वक्तव्यानंतर आठवलेंवर प्रचंड टीका झाली. त्यांनी अधिकृत खुलासा करून त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. इंधन दरवाढीचा रिपब्लिकन पक्षाने विरोध केला आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेची व्यथा आपल्याला चांगली माहीत असून जनभावनेचा नेहमीच आदर राखला आहे. आपण सामान्य जनतेतूनच अडीअडचणींचा सामना करूनच पुढे आलो आहोत. त्यामुळे सामान्य जनतेचे नेमके प्रश्न आपल्याला चांगले माहीत आहेत आणि आपण त्या खस्ता खाल्ल्या आहेत. त्या व्यथा अनुभवल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या भावनांबद्दल आपण कधीही असंवेदनशील राहू शकत नाही. जनतेच्या भावना दुखाविणारे मत आपण कधीही मांडले नाही, असे आठवले यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मीही एक सामान्य आहे आणि आता मंत्री झालोय इतकेच! सामान्यांच्या समस्या मी जाणतो. मी सरकारमध्ये आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करायला हवी, अशी मागणी करत आठवलेंनी जनतेची माफी मागितली.