सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ मधील सिडको वसाहतीमधील अर्ंतगत रस्त्यावर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून जाणार्या एका महिलेच्या गळ्यातील दागिना चोरण्याचा मोटरसायकलवरून आलेल्या एकाने अयशस्वी प्रयत्न केला, त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात त्या ठिकाणी उभ्या असलेल्या नवीन रिक्षाची चोरी झाली. ऐन गणेशोत्सवात हा प्रकार घडल्याने नेरूळ पोलिसांपुढे ही डोकेदुखी वाढली आहे. हा सर्व प्रकार रस्त्यालगत असलेल्या सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी चोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे.
नेरूळ सेक्टर दोन परिसरात सिडकोच्या वसाहतीमधील बाळाराम जोशी मार्गावर हा प्रकार घडला आहे. या परिसरातील पदपथावर दोन जण फिरताना सीसीटीव्हीच्या चित्रणामध्ये स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. दोन जणांपैकी एकाने चेन स्नॅचिंगचा प्रकार केला, तर त्याचाच साथीदार असलेल्या चोराने रिक्षात बसून त्या महिलेकडे घडलेल्या प्रकाराची चौकशी केली. संबंधित महिलेने त्या दोनही भामट्यांना जवळून पाहिले आहे आणि सीसीटीव्हीमध्ये त्या दोन भामट्याचे चेहरेही स्पष्टपणे पहावयास मिळत आहे.
रात्री ११.३० वाजता एक महिला या रस्त्यावरून जात असताना मागून एका दुचाकीस्वाराने गळ्यातील दागिने खेचण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ती महिला वेळीच सावध झाल्याने दागिने लुटण्यास त्या दुचाकीस्वाराला यश मिळाले नाही. त्यानंतर त्याच ठिकाणी उभी असलेली नवीन रिक्षा घेवून दुसर्या भामट्याने पलायन केले. ही रिक्षा नवीन असून त्या रिक्षाला अद्यापि क्रमांकही भेटलेला नाही. अमरदीप सोसायटीच्या सीसीटीव्हीत या सर्व प्रकाराचे चित्रण झाले आहे. नेरूळ सेक्टर दोनमधील रहीवाशी एकनाथ निवृत्ती वाघमारे यांची ही रिक्षा आहे. याप्रकरणी वाघमारे यांच्यासोबत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत पोलिस अधिकार्यांच्या भेटीगाठी घेवून रिक्षाचा लवकरात लवकर तपास करण्याची मागणी संबंधितांना करत आहे. या चोरीचे चित्रिकरण फेसबुक, व्हाट्सअप आणि ट्विटरच्या माध्यमातून सोशल मिडीयात पसरवून संबंधित चोरांचा शोध आम्ही घेणार असल्याचे नवी मुंबईचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी सांगितले.