मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फटकारले आहे. आपला ६८ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक अशा शब्दांत टोला लगावला आहे. यासाठी त्यांनी राज्य सरकारने नुकताच काढलेल्या आदेशाचा दाखला दिला आहे. सर्व शाळांमध्ये मुलांना नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित ”चलो जीते है” हा लघुपट दाखवण्याची सक्ती केली आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा दाखला देत राज ठाकरे यांनी मोदींना ओरखडे ओढले आहेत.
राज ठाकरे यांनी गणपतीच्या रूपात मोदींना दाखवले असून खाली उंदीर म्हणून अमित शाह दिसतात. विशेष म्हणजे त्या गणपतीला मोदी स्वत: ओवाळत आहेत. बाजूला अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह ही नेहमीची मंडळी दिसतात. मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज यांनी हे व्यंगचित्र काढले आहे.
गणपतीरूपी मोदींना चार हात दाखवण्यात आले आहेत. यातील एका हातात वृत्तपत्रे, दुसऱ्या हातात वृत्तवाहिनीचा कॅमेरा, एका हातात इव्हीएम तर एका हातात नोटांचा बंडल दिसतोय. त्याला पक्षनिधी असे नाव राज ठाकरे यांनी दिले आहे. काही माध्यमांना हाताशी धरून मोदी त्यांना हव्या असणाऱ्या बातम्या पेरतात, इव्हीएममध्ये फेरफार करून निवडणूक जिंकतात असा आरोप नेहमी त्यांच्यावर केला जातो. तो राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून दाखवला आहे. मुर्तीच्या मागे पक्षनिधी म्हणून जमा केलेल्या पैशाच्या थैलीही दिसतात.
”बऱ्याच राज्यांनी नाकारलेला मोदींवरचा एक लघुपट महाराष्ट्रात सर्व शालेय विद्यार्थ्यांना आणि शाळांना जबरदस्तीने दाखवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.- बातमी” असा उपहासात्मक मजकूर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या तळाशी लिहिला आहे. एकेकाळी मोदींची स्तुती करणारे राज ठाकरे आता मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.