श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी आज दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी रेल्वेच्या टॉवर व्हॅगनमधून नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पातील स्थानकांची पाहणी केली. सदर दौरा मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. एस. के. तिवारी, मुख्य अभियंता मध्य रेल्वे श्री. एस. एस. केडीया व मध्य रेल्वेचे इतर अधिकारी यांच्यासहीत आयोजित करण्यात आला होता. सदर प्रकल्प वेगाने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकांच्या लाईट, पंखे, सीसीटीव्ही, वॉटर कुलर, तिकीट ऑफीस, प्लॅटफॉर्म्स अशा विविध विकासकामांची पाहणी केली. रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या पुढील कामांसाठी स्थानकांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भातील सूचना त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना या प्रसंगी दिल्या. या सर्व स्थानकांचे सिडकोकडील काम पूर्ण करून पुढील कामे रेल्वेने करावयाची असल्यामुळे त्यांना सहकार्य करण्यासंदर्भातही श्री. लोकेश चंद्र यांनी सूचना दिल्या.
तरघर रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले तरी पहिल्या टप्प्यात या स्थानकावर उपनगरीय रेल्वे थांबणार नाही. खारकोपरपर्यंतची रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी सिडको व रेल्वे या दोन्ही यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
सिवूडस् ते खारकोपर या पहिल्या टप्प्याचे अंतर 12 किमी असून पुढे खारकोपर ते उरण हे अंतर 15 किमी आहे. एकूण 27 किमीचे हे रेल्वे जाळे विकसित करण्यासाठी सिडको व रेल्वे विभाग यांच्याकडून अनुक्रमे 67:33 टक्के अशा गुणोत्तरात गुंतवणूक करण्यात येत आहे. एकूण 1782 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून यात 4 उड्डाण पूल, 15 सबवे मार्गिका, रस्ते यांचा समावेश आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर दुहेरी फलाट, प्रवाशांसाठी सबवे, पिण्याचे पाणी, रेल्वे कार्यालये आणि संलग्न सुविधा व फोरकोर्ट एरियाचा विकास, या सर्व विकासकामांचा समावेश आहे.
या पाहणी दौऱ्यात सिडकोचे मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) श्री. एस. के. चौटालिया, अतिरिक्त मुख्य अभियंता श्रीमती शीला करुणाकरन, अधिक्षक अभियंता श्री. एम. पी. पुजारी, अधिक्षक अभियंता श्री. व्ही. टी. रवि, जनसंपर्क अधिकारी कु. प्रिया रातांबे व इतर अभियंते, कंत्राटदार आणि वास्तुतज्ञ सहभागी झाले होते.