सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : सप्टेंबर महिन्याची २० तारीख उलटली तरी महापालिका प्रशासनात कंत्राटी पध्दतीने काम करणार्या मूषक नियत्रंणच्या कामगारांना ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्यापि मिळालेले नाही. महापालिका प्रशासनात कायम कामगार, ठोक पगारावरील कामगार आणि अन्य विभागातील कंत्राटी कामगार या सर्वांचे वेतन वेळेवर होत असताना केवळ मूषक नियत्रंण विभागाच्या कामगारांचीच वेतन विलंबाबाबत ससेहोलपट गेल्या काही वर्षापासून होत आहे.
महापालिका प्रशासनात ठेकेदाराच्या माध्यमातून ५० कंत्राटी कामगार मूषक नियत्रंण विभागात काम करत आहेत. या कामगारांचे गेल्या अणेक वर्षापासून वेतन विलंबानेच होत आहे, मूषक नियत्रंक कामगारांच्या वेतन विलंबाबत महासभेत, स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी आजतागायत आवाज उठविलेला नाही. तसेच अन्य कामगार संघटनांनीही मूषक नियत्रंण कामगारांच्या वेतन विलंबाबाबत पालिका प्रशासनाला धारेवर धरले नाही.
सप्टेंबर महिन्याची २० तारीख उलटली असून दीड, पाच , सात दिवसाच्या गणपतींचे विसर्जन झाले तरी या मूषक नियत्रंण कामगारांना ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळालेले नाही. आपला पगार कधी होणार याबाबत कामगारांनी ठेकेदाराला फोन केल्यास ठेकेदार फोन उचलण्याची तसदीही घेत नाही. गेल्या पाच वर्षापासून मूषक नियत्रंणच्या कामगारांना गणवेशही मिळालेला नाही. दिवसा व रात्री अशा दोन पाळ्यांमध्ये मूषक नियत्रंण कामगारांना काम करावे लागते. अनेकदा बॅटरी व काठीही कामगारांना स्वखर्चानेच विकत घ्यावी लागते. पगाराबाबत नगरसेवक व कामगार संघटना पालिका प्रशासनाला धारेवर धरत नाही आणि ठेकेदार फोन केला तर उचलत नाही अशा दुहेरी कात्रीत मूषक नियत्रंण कामगार अडकलेले पहावयास मिळत आहे.