पनवेल, : मनमोहक अदाकारी… नृत्यमय लयकारी… गाण्याची तान… जगातील वर्तमान घडामोडींचे भान… या आणि कलाविष्कारांच्या धारांनी भिजवून टाकणाऱ्या शिर्के डेकोरेटर्सच्या ‘मिस अॅण्ड मिसेस’चा सेमी फायनल राऊंड पनवेलच्या हॉटेल वीर रेसिडेन्सीमध्ये धुम धडाक्यात पार पडला.
मॉडेलिंग आणि फॅशन क्षेत्रात गुणवान होतकरू मॉडेल्स यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणा-या शिर्के डेकोरेटर्स अॅण्ड इव्हेंट्सने आयोजित केलेली मिस अॅण्ड मिसेस पनवेल ही स्पर्धा म्हणजे पनवेलमधील कलावंत, गुणवंत महिला आणि मुलींना स्वतःमधील हुनर जाणत्यांपुढे सादर करण्याची उत्तम संधी. घागरा, चुडीदार, वेस्टर्न वुमेन्स वेअर परिधान करत रॅम्पवर कॅटवॉकद्वारे महिला आणि मुलींनी सादर केलेले नवनवीन डिझाइन असलेली कॉस्च्यूम्स, रॅम्पवर उतरलेली तरुणाई, अशा रंगतदार वातावरणात शिर्के डेकोरेटर्सचा मिस अॅण्ड मिसेसचा सेमी फायनल शो पार पडला. नवीन पनवेलच्या हॉटेल वीर रेसीडेन्सीमध्ये सायंकाळी फॅशन शोला सुरुवात झाली. संगीत,गीताचा ठेका अन् रॅम्ववर होणारा कॅटवॉक त्यात टाळ्यांचा गजर स्पर्धकांना प्रोत्साहन देणारा ठरला. मॅनेजमेंट, मेडिकल, इंजिनीअरिंग, कला आदी क्षेत्रात पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महिला आणि मुलींनी या स्पधेर्त भाग घेऊन रंगमंचावरही ‘हम किसीसे कम नही’ची झलक दाखवून दिली. उत्तम शिक्षणाबरोबरच कलागुणांतील सरसता आणि आत्मविश्वासाची चुणुक सहभागी स्पर्धकांनी दाखवली. परीक्षकांच्या प्रश्नांना कधी बिनधास्त, कधी प्रांजळ तर कधी सडेतोड उत्तरे देत आपल्या बुद्धिमत्तेची आणि व्यक्तिमत्त्वाची चुणुकही स्पर्धकांनी अवघ्या काही मिनिटांच्या सादरीकरणात दाखली.
परीक्षकांच्या प्रश्नांचा सामना या कसोट्यांवर उतरणाऱ्या जवळजवळ 300 स्पर्धकांमधून 25 मिस आणि 25 मिसेस अंतिम सामन्यांसाठी निवडण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीअंती पहिल्या तीन मिस अॅण्ड मिसेसला लखलखता मुकूट मिळणार असला तरी इतर या 50 जणींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वासाची भरभक्कम शिदोरी मिळणारेय.
आजच्या काळातली स्त्री आधुनिक असूनही परंपरांचा आदर करणारी, धाडसी पण विचारी, आयुष्यातील आव्हानांना पेलायला समर्थ असलेल्या मिस आणि मिसेस पनवेलचा शोध या स्पर्धेतून घेण्यात येतो. महाविद्यालयीन काळात विविध स्पर्धांमधून स्त्रिया भाग घेतात. मात्र संसाराच्या रहाटगाडग्यात ते करणे त्यांना शक्य होत नाही. या महिलांना पुन्हा एक व्यासपिठ देऊन एक विरंगुळ्याचा क्षण त्यांच्या आयुष्यात यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केलं असल्याचं शिर्के डेकोरेटर्सचे भूषण शिर्के यांनी सांगितलं. तर फॅशन शो म्हटला की त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. मात्र यावर्षी आयोजित स्पर्धेत वेगवेगळ्या संस्कृतीचे दर्शन पनवेलकरांना मिस आणि मिसेस पनवेल स्पर्धेच्या माध्यमातून पहायला मिळतोय. या स्पर्धेच्या सेमी फायनलसाठी गेले महिनाभर प्राथमिक फेर्या सुरु होत्या, असं शिर्के डेकोर्टर्स अॅण्ड इव्हेंटस्चे ऋषी धुमे यांनी सांगितलंय. हा आगळा-वेगळा फॅशन शो पाहण्यासाठी पनवेलकरांनी चांगलीच गर्दी केली होती.