पनवेल : शासनाने पनवेल तालुक्यातील 23 गावांसाठी टीपीएस परियोजना मंजूर केली आहे. त्यानुसार नैनाने टीपीएस योजनेची तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकार्यांना दिले. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दालनात सोमवारी (8 ऑक्टोबर) नैनाचे मुख्य नगररचनाकार वेणुगोपाळ यांच्यासह चिखले, शिवकर व उसर्ली येथील शेतकर्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेऊन सिडको अध्यक्षांनी हे आदेश दिले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, चिखलेचे सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच रमेश गडकरी, हिरामण पाटील व इतर सदस्य, तसेच शिवकर येथील भाजपचे पळस्पे विभाग अध्यक्ष व माजी सरपंच अनेश ढवळे, अंबो ढवळे, ग्रामपंचायत सदस्य गोटीराम ढवळे, उसर्लीचे माजी सरपंच विजय भगत, मच्छिंंद्र पाटील, जयंत भगत, देवेंद्र भगत यांसह शेतकरी व नैनाचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित शेतकर्यांनी सांगितले की, नैना परियोजनेमध्ये उसर्ली खुर्द, चिखले व शिवकर या गावांचा समावेश करावा यासाठी येथील शेतकर्यांनी नैना प्रशासनाकडे मागणी केली होती. त्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने या भागात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून गुंतवणूकदारांची विकसकांकडून फसवणूक केली जात आहे. नैना परियोजनेचा कामांचा पहिला टप्पा 23 गावठणसाठी मंजूर असताना फक्त आकुर्ली, चिपले, विहीघर, देवद, कोप्रोली, भोकरपाडा, नेरे, मोहो, नेरेपाडा, बोनशेत आदी गावांतच त्याची कामे सुरू आहेत. उसर्ली खुर्द आणि चिखले ही गावे भौगोलिकदृष्टया महत्त्वाची असून व या गावांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवेश, चिखले नियोजित रेल्वेस्टेशन, नवी मुंबई विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग आणि नियोजित अलिबाग-विरार कॉरिडोर यांना जोडले असूनही या ठिकाणी नैनाची कामे सुरू न करता विकासकांना फायदेशीर ठरतील अशा ठिकाणाचीच नगर परियोजना (टीपीएस) मंजूर करण्यात आली आहे.
तसेच 27 एप्रिल 2017 मध्ये शासनाने 23 गावांसाठी पहिल्या फेजचे काम (टीपीएस) नगरपरियोजना मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याकडे लक्ष देऊन नैना नगर परियोजनेमधील (टीपीएस) योजनेमध्ये उसर्ली खुर्द, चिखले आणि शिवकर या गावांचा समावेश तातडीने करण्यासंदर्भात सिडको प्रशासन आणि नगरविकास विभागाला तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी केली.
शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित अधिकार्यांना टीपीएस योजनेची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यावर टीपीएस 5 मध्ये उसर्ली, चिखले, शिवकर, विचुंबे यांसह सर्व गावे घेऊन 4-5 महिन्यांत ते काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन मुख्य नगररचनाकार वेणुगोपाळ यांनी उपस्थित शेतकर्यांना दिले. सध्या टीपीएसचे काम चालू आहे. येत्या 4-5 महिन्यांत ते पूर्ण होईल व शेतकर्यांना त्यांचे विकसित भूखंड (प्लॉट) मिळतील. सदर टीपीएसमुळे शेतकर्यांच्या जमिनीमध्ये इमारतींची विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू होण्यास मदत होईल, तसेच शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदाही होणार आहे, असे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व मुख्य नगररचनाकार वणुगोपाळ यांनी या वेळी सांगितले.
******
नवे शहर उदयास येणार
नवे शहर उदयास येणार
टीपीएस योजना पूर्ण झाल्यावर चिखले रेल्वेस्टेशनमुळे एक नवे शहर चिखले गावाजवळ उदयाला येईल. या शहराला मुंबई-पुणे, मुंबई-गोवा या महामार्गांसह, पनवेल-कर्जत, पनवेल-रोहा, रेल्वेमार्ग, मेगा सिटी, तसेच एअरपोर्ट, एनएच 4 बी जोडले जाणार आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या जमिनीचा विकास झाल्याने येथील शेतकर्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळणार असून त्यांचे रहाणीमान उंचवण्यास मदत होणार आहे