नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत पर्यावरणाला व प्राणी जीवनाला हानीकारक प्लास्टिकवर प्रतिबंध घालण्यात आला असून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनजागृतीसोबतच प्लास्टिक वापर करणा-यांविरोधात जप्ती व दंडवसूली स्वरूपात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
या अनुषंगाने वाशी विभाग कार्यक्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने रघुलीला मॉलमध्ये प्लास्टिक बंदीची विशेष कारवाई करण्यात आली. यामध्ये मॉलमधील व्यावसायिकांकडून वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू जप्त करण्यात आल्या व 11 व्यावसायिकांकडून प्रत्येकी रू. 5 हजार प्रमाणे एकूण रू. 55 हजार इतकी दंडांत्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्याचप्रमाणे इन ऑर्बिट मॉल मध्ये 12 व्यावसायिकांकडून रू. 60 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली व 2.5 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये वाशीचे विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी क्षेत्रीय अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख व श्री.राजेंद्र पाटील तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्री. सुधीर पोटफोडे व श्रीम. कविता खरात, उप स्वच्छता निरीक्षक श्रीम.सुषमा देवधर व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अशाचप्रकारे नेरुळ विभाग कार्यक्षेत्रातही विभाग अधिकारी श्री. संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली सेक्टर-6 येथील दुकाने व हॉटेल व्यवसायिकांवर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये मॉलमधील सर्व व्यावसायिकांकडून वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू जप्त करुन 11 व्यावसायिकांवर प्रत्येकी रू. 5 हजार प्रमाणे दंडात्मक कारवाई करून रू. 55 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
प्लास्टिक बंदीबाबत कोपरखैरणे विभागात सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी व बेलापूर कार्यक्षेत्रात विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या प्लास्टिक प्रतिबंध व सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्या दुकाने व हॉटेल व्यावसायिकांवर विशेष दंडात्मक मोहिमेत कोपरखैरणे विभागामार्फत रू. 13 हजार तर बेलापुर विभागामार्फत रू. 10 हजार 500 अशी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात असलेल्या प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करणे तसेच बंदी घातलेले प्लास्टिक घटक यांची विक्री, साठा अथवा वापर कोणीही करू नये असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरीही अशा प्रकारचा प्लास्टिक वापर करणा-यांवर दंड व जप्तीची कारवाई देखील करण्यात येत आहे. तथापि प्लास्टिक हे आपल्याच जीवनासाठी हानीकारक आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तूंचा / थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळावा असे आवाहन करण्यात येत आहे.