अकोला : दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे राज्यातील सतरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतक-यांना मदत करून आत्महत्या कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सरकार शेतक-यांना मानसोपचार घ्यायला सांगून शेतक-यांची क्रूर चेष्टा केली आहे. शेतक-यांना नाही तर सरकारमधील बेताल मंत्र्यांनाच मानसोपचाराची गरज आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याच्या चौथ्या दिवसाची सुरुवात वाशिम येथून झाली. जनसंघर्ष यात्रा रिसोडला पोहोचली रस्त्यात जागोजागी गावक-यांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. रिसोड तालुक्यातील किणखेडा शिवारात येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शेतात जाऊन शेतक-यांशी चर्चा केली व त्यांच्यासोबत वनभोजन केले. रिसोड आणि अकोला शहरातील विशाल जनसंघर्ष सभेला मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी भाजप शिवसेना सरकारवर सडकून टीका केली. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, वसंत पुरके, आ. अमित झनक, आ. राहुल बोंद्रे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, माजी आ. आशिष देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर, रामकिसन ओझा, प्रकाश सोनावणे, सचिव शाह आलम शेख, दादासाहेब मुंडे, वाशिम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप सरनाईक, अकोला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबनराव चौधरी, अकोला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हिदायत पटेल, मदन भरगड, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. चव्हाण म्हणाले की, भाजप शिवसेना सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. अनेक भागात तीव्र पाणीटंचाई आहे. जनतेला प्यायला पाणी नाही. सरकार पाण्याचे टँकर सुरु करण्याऐवजी सकाळी आठ वाजल्यापासून दारू दुकाने उघडण्याची परवानगी देत आहे. सरकारला शेतक-यांपेक्षा दारू पिणा-यांची जास्त चिंता आहे. कर्जमाफीची घोषणा करून वर्ष उलटले तरी शेतक-यांच्या हाती काही पडले नाही. पीक विमा नाही. शेतीमालाला भाव नाही. बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. सरकारने आता शेतक-यांचा अंत पाहू नये. शेतक-याने रूमणे हातात घेतले तर सरकारला पळता भुई थोडी होईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
राज्याचे माजी पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, वसंत पुरके, आ. अमित झनक यांनीही आपल्या भाषणांमधून केंद्र राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली.