नवी मुंबई : नवी मुंबईतील वीज समस्यांविरोधात सर्वाधिक आवाज उठवून त्यांची सोडवणुक करणारे आमदार म्हणून संदीप नाईक ओळखले जातात. त्यांच्या पाठपुराव्यामुळे घणसोली, तळवली, गोठीवली,राबाडा या परिसरासाठी महावितरण स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारणार आहे त्यामुळे येथील वीजेचा लपंडाव कमी होवून वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.
नुकत्याच झालेल्या राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनात आमदार नाईक यांनी स्वतंत्र उपकेंद्र कधी कार्यरत होणार? असा प्रश्न शासनाकडे उपस्थित केला होता. त्याला उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. घणसोली परिसरात स्वतंत्र उपकेंद्र उभारण्यासाठी महावितरणच्या विभागीय कार्यालयाने सिडकोकडे जागेची मागणी केलेली आहे. ही जागा प्राप्त होताच या ठिकाणी स्वतंत्र उपकेंद्र सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही उर्जामंत्री बावणकुळे यांनी आमदार नाईक यांना दिली आहे.
घणसोली, घणसोली गाव, तळवली गाव, गोठिवली गाव, राबाडा या भागात वारंवार वीजेचा पुरवठा खंडीत होत असतो. या विरोधात आमदार नाईक यांनी वेळोवेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठका घेवून त्यांना निवेदन देवून ही समस्या सोडविण्याची मागणी केलेली आहे. अनियमित वीज पुरवठयाविरोधात नागरिकांसह आंदोलन करुन महावितरणच्या अधिकार्यांना कंदील भेट देवून निषेध देखील केला होता. घणसोली गाव व त्याचा आजुबाजूचा परिसर झपाटयाने विकसीत होत आहे. त्यामुळे या भागातील वीजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा भार घणसोली फिडरवर पडत असल्याने तळवली आणि परिसरातील नागरिकांना वीज खंडीत होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे जुन २०१७मध्ये आमदार नाईक यांनी उर्जामंत्री बावणकुळे यांच्याकडे घणसोली परिसराकरिता स्वतंत्र उपकेंद्राची मागणी करणारे लेखी निवेदन दिले होते. त्या अनुशंगाने महावितरणने या उपकेंद्रासाठी कार्यवाही सुरु केली आहे.