भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होत असतात, अशी खोचक टीका केली आहे.
आपल्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आठवले यांनी माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही. माझ्यावर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावीमागे कोणाचे हात आहेत, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. तो धागा पकडत प्रकाश आंबेडकरांनी आठवलेंना टोला लगावला.
आठवले हे अंबरनाथ येथे एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी मंचावरुन खाली उतरताना प्रवीण गोसावी या तरुणाने त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यानंतर आठवलेंच्या समर्थकांनी गोसावीला बेदम मारहाण केली होती. गोसावी हा मुळचा अमरावती जिल्ह्यातील असून सध्या अंबरनाथ येथे राहतो. तो बांधकाम व्यावसायिक आहे. पूर्वी तो तो मनसे वाहतूक सेनेचा पदाधिकारी होता. त्यानंतर तो काही काळ रिपाइंत (आठवले गट) सक्रिय होता. तेथूनही तो बाहेर पडला व नंतर भारिप बहुजन महासंघाचे काम पाहू लागला.