नवी मुंबई : गोवर व रूबेला आजारांपासून आपली मुले संरक्षित असावीत याकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून राज्यातील महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे काम सर्वोत्तम असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मोहिमेच्या अगदी सुरूवातीपासूनच प्रसिध्दी, प्रचार यंत्रणा यामध्येही नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वात चांगली कामगिरी केली असून आरोग्य व शिक्षण विभागाच्या एकत्रित सहयोगाने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये इंडियन असोसिएशन ऑफ पिडीयाट्रीक्सच्या माध्यमातून शहरातील नामांकीत बालरोगतज्ज्ञही पुढाकार घेत पालकांच्या मनातील लसीकरणाबाबतच्या शंकाकुशंका दूर करण्यासाठी मार्गदर्शकाची महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत.
यामुळे लसीकरणाच्या पहिल्या शालेय सत्रात २७ नोव्हेंबरपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३८२ शाळांमध्ये १७७० सत्रांमधून इयत्ता दहावीपर्यंतच्या २ लक्ष ३४ हजार ६६० मुलांना गोवर रूबेला लसीकरण करण्यात आले आहे. १८ डिसेंबर पर्यंत शालेय स्तरावर लसीकरण सत्र असणार असून त्यानंतर बाह्य लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे.
तरी नवी मुंबईतील सुजाण व आरोग्यप्रेमी नागरिकांनी आपल्या ९ महिने ते १५ वर्षे वयाच्या मुलांना अवश्य गोवर रूबेला लस देऊन या आजारांपासून त्याचे संरक्षण करावे असे आवाहन करतानाच महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने शालेय लसीकरण सत्रात जी मुले लसीकरणाच्या दिवशी उपस्थित नव्हती अशा गैरहजर मुलांच्या पालकांनीही महापालिका रूग्णालयात अथवा नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.