स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : स्वच्छता ही प्रत्येकाची नियमित सवय व्हावी व यामधून स्वच्छ शहराची संकल्पना कायमस्वरूपी टिकून रहावी हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ ला सामोरे जाताना विविध उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये विद्यार्थी सहभागावर विशेष भर देण्यात येत आहे.
स्वच्छता सैनिक म्हणून विद्यार्थ्यांच्या उमलत्या कोवळ्या मनावर लहान वयातच स्वच्छतेचा संदेश बिंबविल्यास उद्याचे नवी मुंबईचे नागरिक स्वच्छतेविषयी सदैव जागरूक असतील या संकल्पनेतून स्वच्छता विषयक उपक्रमांमध्ये लहान मुलांचा आवर्जून समावेश करून घेण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
याच अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांच्या पातळीवर स्वच्छताविषयक मोहिमा राबविण्यात येत आहेत. बेलापूर येथील विद्याप्रसारक हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे अशाच प्रकारची स्वच्छता मोहिम व्यापक स्वरूपात राबविण्यात आली, ज्यामध्ये विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. याप्रसंगी मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे यांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण व त्याची विल्हेवाट, ई कचरा, प्लास्टिकला प्रतिबंध अशा महत्वपूर्ण बाबींवर विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांचे प्रबोधन केले व आपल्या पालकांसह, शेजारी, नातेवाईक आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करीत रॅलीव्दारे विद्याप्रसारक हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी बेलापूरगांव व परिसरात स्वच्छतेचा जागर केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनावणे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही विद्यार्थ्यांसह महानगरपालिकेच्या बेलापूर विभागातील स्वच्छता अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.