आमदार संदीप नाईक यांनी दिलेला शब्द पाळला
नवी मुंबई : माथाडी, बेस्ट कामगार तसेच श्रमिकांसाठी सिडकोनिर्मित सर्व वसाहती कंडोमिनियमअंतर्गत नागरी सुविधांची कामे नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून सुरु व्हावीत, यासाठी आमदार संदीप नाईक गेलीे अनेक वर्षे सातत्याने शासनाच्या मंजुरीसाठी अविरत पाठपुरावा करीत होते. तसा शब्द त्यांनी जनतेला दिला होता अखेर त्यांनी हा शब्द खरा करून दाखवला असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्य शासनाने या संबंधीचा निर्णय घेतला असून तसे परिपत्रक ( शासन निर्णय क्रमांक नमुंम-१२१४/प्र. क्र. १०१/नवि २८) १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले आहे. विधीमंडळाच्या अलीकडेच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईकरांच्या या जिव्हाळयाच्या प्रश्नी अर्धा तास चर्चा या संसदीय आयुधाच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा घडवून आणली. ही कामे सुरु करण्यासाठी पालिकेने जो परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे त्याला शासनाने तात्काळ मंजुरी द्यावी जेणेकरुन ही कामे महिनाभरात सुरु करता येतील, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली असता नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी त्याला होकार दर्शविला होता. २०१४ पासून आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री महोदय, नगरविकास मंत्री, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे कंडोमिनियमअंतर्गत कामांस मंजुरी मिळावी, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. याशिवाय विधीमंडळाच्या अधिवेशनांमधून तारांकीत प्रश्न, लक्षवेधी, अर्धातास चर्चा, औचित्याचा मुददा या संसदीय आयुधांचा वापर करुन या विषयाला विधानसभेत वाचा फोडली आहे.
नवी मुंबईत सिडकोने वाशी, कोपरखैरणे, घणसोली इत्यादी ठिकाणी अल्प, मध्यम अशा विविध उत्पन्न गटांसाठी सदनिका बांधल्या. या वसाहती २५ ते ३० वर्षांच्या झाल्यानंतर त्यामधील मलनिःस्सारण वाहिन्या, जलवाहिन्या जुन्या आणि नादुरुस्त झाल्या आहेत. गटारे, पदपथ, चौकांची दुरावस्था झाली आहे. मात्र या वसाहतींमधून राहणार्या रहिवाशांची आर्थिक क्षमता नसल्याने या सुविधांच्या दुरुस्तीची किंवा त्या नव्याने निर्माण करण्याची कामे ते करु शकत नाहीत. त्यामुळे या रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, ही बाब आमदार नाईक यांनी शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. विशेषतः पावसाळयात या वसाहतींमधून पाणी तुंबून डासांची पैदास होते आणि डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या रोगांचा फैलाव होत असतो. नवी मुंबई महापालिका या वसाहतींमध्ये नागरी सुविधांची कामे करण्यास तयार आहे. २०००-२००१ पासून महापालिकेने ही कामे करण्यास सुरुवात केली होती. ८० टक्के कामे पालिकेने पूर्ण केली. मात्र त्यानंतर ही कामे पालिकेच्या निधीतून करण्याच्या मार्गदर्शक तत्वात् बसत नाहीत हे कारण देत शासनाने त्यावर बंदी आणली होती. केवळ २० टक्के कामे बाकी आहेत. ही बंदी म्हणजे एक प्रकारे कंडोमिनियममधून राहणार्या हजारो नागरिकांवर अन्यायच आहे, याकडे आमदार नाईक यांनी विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले होते. ही कामे करण्यास पालिकेला परवानगी द्यावी आणि पालिकेने यासाठी जो प्रस्ताव पाठवला आहे त्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली होती. आमदार नाईक यांच्या मागणीनुसार शासनाने पालिकेचा प्रस्ताव मंजूर केला असून ३०० चौरस फुटापर्यंत क्षेत्रफळांच्या आणि कुंपण नसलेल्या कंडोमिनियममध्ये मलनिःस्सारण आणि पाणी पुरवठ्याची कामे पालिका निधीतून करण्यास पालिकेला परवानगी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात ३०० चौरस फुटापर्यंत क्षेत्रफळांच्या आणि कुंपण नसलेल्या कंडोमिनियममध्ये मलनिःस्सारण आणि पाणी पुरवठ्याची कामे करण्यास शासनाने परवानगी दिली आहे मात्र सर्व सिडकोनिर्मित वसाहती आणि कंडोमिनियममध्ये ही कामे करण्यास मंजुरी मिळवून देणे हेच अंतिम धेय आहे.
– आमदार संदीप नाईक