नवी मुंबई : महाराष्ट्रातील श्रीमंत महापालिका गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार नेहमीच उजेडात येत असतो. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात सलग दोन वर्षे राज्यात प्रथम क्रमाकांचे पारितोषिक, स्वमालकीचे धरण. केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने पारितोषिकांचा वर्षाव होतच असतो. पालिका प्रशासनात मूषक नियत्रंणचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन ठेकेदाराने दिले असले तरी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे वेतन मात्र कामगारांना अद्यापि मिळालेले नाही.
अन्य कामगारांना पालिका प्रशासनाकडून दिवाळीच्या सुमारासच बोनस मिळाला असला तरी मूषक नियत्रंणच्या कामगारांना ठेकेदाराने १९ हजार रूपये बोनस नुकताच काही दिवसापूर्वी दिलेला आहे. मूषक नियत्रंण कामगारांची गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक ससेहोलपट सुरु आहे. दोन ते तीन महिने त्यांचे वेतन कायमच रखडलेले असते. या कामगारांना दिवसा व रात्रीही काम करावे लागत असतानाही त्यांना ठेकेदाराकडून बॅटरी, काठी, ग्लोव्हॅज आदी साहीत्यही पुरविले जात आहे. उंदिर मारण्याच्या केमिकलयुक्त गोळ्या त्यांना ग्लोव्हॅजअभावी उघड्या हातानेच टाकाव्या लागत आहे. तसेच मृत उंदिरही तशाच परिस्थितीत गोळा करावे लागत आहेत.
मूषक नियत्रंण कामगारांची ठेकेदारांकडून गेल्या काही वर्षापासून आर्थिक ससेहोलपट होत असताना पालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग आणि नगरसेवकही त्याकडे कानडोळा करत आहे. वेतन विलंबाबाबत त्यांना पालिका प्रशासनाकडून तसेच ठेकेदाराकडून कधीही समाधानकारक उत्तर मिळत नाही. उलट त्या कामगारांचे फोन न उचलण्याकडे पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचा व ठेकेदाराचा कल असतो. ठेकेदाराने त्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार दिला असला तरी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचा पगार अजून दिलेला नाही. पालिकेने बील मंजूर केले नसल्याचे थातूर मातूर उत्तर देत ठेकेदार मूषक नियत्रंण कामगारांची बोळवण करत आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकाराची चौकशी करतो, असे सांगितले.