सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई या आधुनिक नावाजलेल्या शहराला मोठी सांस्कृतिक परंपरा असून इथल्या मूळ गावांमधून नाटय, गायन, संगीत सादरीकरणाची परंपरा अनेक वर्षापासून जपली जात आहे. त्यामध्ये नवी मुंबई शहर वसल्यानंतर मोठया प्रमाणावर भर पडली असून नवी मुंबई महानगरपालिका येथील कलावंतांना विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे असे सांगत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धेच्या माध्यमातून येथील मुलांना आपले कलागुण दाखविण्याची चांगली संधी उपलबध करुन दिली जात आहे असे मनोगत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने विष्णुदास भावे नाटयगृहात आयोजित नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धा अंतिम फेरीच्या शुभारंभ प्रसंगी महापौरांनी सादरीकरण करणाऱ्या बालनाटय समुहांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महापौर जयवंत सुतार यांच्या समवेत सभागृह नेते रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती मुनवर पटेल व उप सभापती .गिरीश म्हात्रे, नामवंत अभिनेत्री नयना आपटे, दिग्दर्शक किरण नाकती व प्रताप फड, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आदी उपस्थित होते.
नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धा महोत्सवात राज्यभरातील विविध जिल्ह्यातून २८ बालनाटय समुहांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्राथमिक फेरीतून अंतिम ८ बालनाटयांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. त्यामध्ये सुजाण प्रतिष्ठान शहापूर, रंग शारदा कलामंच खोपोली, सेक्रेड हार्ट हायस्कुल वरप कल्याण, आर्टिस्ट प्लॅनेट ऐरोली, निष्ठा सामाजिक संस्था वाशी, शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान ऐरोली, संदेश विदयालय विक्रोळी तसेच समृध्दी सांस्कृतिक कलामंच ठाणे हे ८ बालनाटय समूह २ जानेवारी रोजी अंतिम फेरीत दिवसभर सादरीकरण करणार असून सायंकाळी ७ वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.