राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांची माहिती
नवी मुंबई : केवळ चुनावी जुमले देवून फसवणूक करणार्या राज्यातील आणि केंद्रातील भाजपाप्रणित सरकारला जनता विटली असून ती आता सत्ताबदलाच्या माध्यमातून परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे. या बदलत्या मानसिकतेला प्रतिबिंबीत करण्यासाठी प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निर्धार परिवर्तन यात्रा १० जानेवारीपासून काढण्यात येणार आहे. ही यात्रा १२ जानेवारी रोजी नवी मुंबईत येणार असून या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची जाहिर सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी दिली आहे.
निर्धार परिवर्तन यात्रेच्या नवी मुंबईतील संपर्क यात्रेची तयारी करण्यासाठी रविवारी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, प्रदेश चिटणीस भालचंद्र नलावडे, नवी मुंबई अल्पसंख्याक सेलचे प्रमुख ऍड जब्बार खान, श्याम महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड किल्ल्यावर महाराजांना नमन करुन या यात्रेचा प्रारंभ १० जानेवारी रोजी होणार आहे. १२ जानेवारी रोजी ही यात्रा नवी मुंबईत येणार असून सायंकाळी ५ वाजता कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानात पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांची जाहिर सभा होणार आहे. ज्येष्ठ नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, लोकनेते गणेश नाईक, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
अलिकडेच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपाचा दारुन पराभव झाला. यावरुन हेच सिध्द होते की आता जनतेला बदल हवा आहे. शेतकर्यांचे, कष्टकर्यांचे प्रश्न हे सरकार सोडवू शकले नाही. इंधन दरवाढ होतेच आहे. जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. बेरोजगारी आहे. सर्व आघाडयांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांची ही फसवेगिरी या निर्धार परिवर्तन यात्रेतून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे, असे सांगून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील पक्ष संघटनेच्या दृष्टीकोणातून कामाला लागावे, असे आवाहन डॉ.संजीव नाईक याप्रसंगी केले. आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार आणि जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले