नवी मुंबई : सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत गावाला अनधिकृत होर्डीगमुळे बकालपणा आला आहे. सारसोळे मच्छि मार्केटलाही अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग यावर कारवाई न करता आजवर कानाडोळा करत असल्याने अतिक्रमणच्या या कर्मचारी व अधिकार्यांच्या सत्काराची वेळ मिळण्याची लेखी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ पश्चिमला असलेल्या नेरूळ सेक्टर सहाच्या बाहेरील व अर्ंतगत भागातील रस्त्यावर आणि सारसोळे व कुकशेत गावातील बाह्य रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर राजकीय घटकांचे अनधिकृतपणे बॅनर व होर्डीग झळकताना आपणास पहावयास मिळतात. यामुळे पालिका प्रशासनाचे आर्थिक नुकसान होत असून प्रभाग ८५ व ८६ परिसरालाही बकालपणाचे गालबोट लागत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांकडून व अधिकार्यांकडून या बॅनर व होर्डीगवर तात्काळ काढून टाकण्याची कार्यवाही होत नाही आणि अनधिकृत होर्डीग लागणार्या राजकीय घटकांवर आजतागायत फौजदारी गुन्हेही दाखल झालेले नाही. त्यामुळे पालिकेचे आर्थिक उत्पन्न बुडत असतानाही अनधिकृत होर्डीग व बॅनर लावणार्यांची पाठराखण करणार्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी खरोखरीच अभिनंदनास पात्र असल्याचे खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात मच्छि मार्केटच्या सभोवताली गेल्या काही महिन्यापासून अनधिकृतरित्या व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. येथून दुचाकी व तीन चाकी वाहन चालविणे अवघड झाले आहे. यामुळे त्या भागात वाहतुक कोंडीची समस्या वाढून बकालपणाही वाढीस लागला आहे. तुमच्या विभाग कार्यालयाच्या अखत्यारीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी या मच्छि मार्केटपासून हाकेच्या अंतरावरच निवासी वास्तव्य करत असताना या ठिकाणी फेरीवाल्यांचा उद्रेक वाढीस लागणे म्हणजे याचा अर्थ समजण्यापलिकडे नक्कीच नाही. मच्छि मार्केटसभोवताली असणार्या फेरीवाल्यांना संरक्षण देणे, त्यांच्यावर कारवाई न करणे तसेच प्रभाग ८५ व ८६ मध्ये अनधिकृतरित्या लागणार्या बॅनर व होर्डीगवर वरचेवर कारवाई न करणे आणि राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या होर्डीग व बॅनर लावणार्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे जाणिवपूर्वक दाखल न करणे असे कार्य आपल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी व अधिकार्यांकडून होत आहे. करदात्या नागरिकांनी भरलेल्या करातून या अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन होत असतानाही अनधिकृत फेरीवाल्यांना आश्रय देणे आणि अनधिकृत बॅनर व होर्डीग लावणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करणे यामुळे अशा अतिक्रमण विभागातील कर्मचारी व अधिकार्यांचा सत्कार करण्याचे आम्ही ठरविले आहे. आपण अतिक्रमण उपायुक्त व महापालिका आयुक्तांशी चर्चा करून आम्हाला सत्काराची वेळ कळवावी. आम्ही व आमचे सर्व पत्रकार मित्र येवून आपल्याच दालनात अतिक्रमण विभागाच्या संबंधित कर्मचारी व अधिकार्यांचा सत्कार करूआमचा परिसर फेरीवाल्यांमुळे, होर्डीगमुळे बकाल झाला तरी चालेल, पालिकेचा महसूल बुडाला तरी चालेल या भूमिकेशी ठाम राहणार्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांचा वास्तविक नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणुन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणे आवश्यक आहे. आपण त्या अधिकारी व कर्मचार्यांची नावे लेखी स्वरूपात दिल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचीही लवकरात लवकर वेळ घेवू. आपल्या उत्तराची आम्ही प्रतिक्षा करत असल्याचे खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.