नवी मुंबई : चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा ज्याप्रमाणे शहराच्या नावलौकीकात भर घालतात त्याचप्रमाणे बेरोजगारीचे प्रमाण कमी असणे हे देखील शहराच्या लौकीकात भर घालते असे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी महानगरपालिका यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत रोजगार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या तरूण तरूणींना शुभेच्छा दिल्या. तरूणाईने आपल्या शैक्षणिक पात्रतेसोबतच सामान्य ज्ञान वाढविण्यावरही भर दिला पाहिजे त्याचप्रमाणे मुलाखतीला जाताना आत्मविश्वासाने सामोरे जायला पाहिजे व पोषाखापासून आपल्या विषयाच्या माहितीपर्यंत सगळ्या गोष्टींचे ज्ञान असले पाहिजे असे मार्गदर्शन करत एका अपयशाने निराश न होता सातत्याने प्रयत्न करीत रहा यश मिळणारच असा संदेश उपस्थित तरुणाईला दिला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे व दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील नमुंमपा शंकरराव विश्वासराव विद्यालय शाळा क्र. 28 येथे आयोजित ‘रोजगार मेळावा आणि मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी लाभार्थी निवड / नोंदणी’ अभियान प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
यावेळी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत व्यासपीठावर बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, परिवहन समितीचे सभापती श्री. रामचंद्र दळवी, फ प्रभाग समितीच्या अध्यक्ष श्रीम. अनिता मानवतकर, अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील, नगरसेवक श्री. गिरीश म्हात्रे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त श्री. अमोल यादव, समाज विकास अधिकारी श्री. सर्जेराव परांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी युवकांनी आपल्या शैक्षणिक ज्ञानाप्रमाणेच व्यक्तिमत्व विकासावर भर द्यावा असे सांगत कोणत्याही मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जावे व काळाची गरज ओळखून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व वाढवावे अशा शब्दात मार्गदर्शन केले. नोकरीप्रमाणेच व्यवसाय करून स्वयं रोजगारावर भर द्यावा असे आवाहन करीत याकरीता सरकारमार्फत राबविल्या जाणा-या विविध योजनांचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
सभागृह नेता श्री. रविंद्र इथापे यांनी रोजगार मेळाव्याला मिळालेल्या मोठ्या प्रमाणातील प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करीत या रोजगार मेळाव्यातून नोकरी उपलब्ध होणा-या युवकांनी प्रामाणिकपणे काम करून स्वत:चा व नोकरी मिळालेल्या संस्थेचा विकास करावा तसेच नोकरी न मिळालेल्या युवकांनी आपल्यामधील कमतरतेचा शोध घेऊन हा अनुभव नजरेसमोर ठेवून ती दूर करण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत, यश मिळणारच असा आत्मविश्वास जागविला.
रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासूनच युवक, युवतींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अत्यंत सुनियोजित पध्दतीने प्रत्येकाची नोंदणी करून, त्यांची माहिती भरून घेऊन कागदपत्रे तपासून, त्यांना अपेक्षित असलेल्या क्षेत्रामधील कंपन्यांच्या दालनामध्ये पाठविण्यात येत होते. उपस्थित तरुणाईसाठी मार्गदर्शक व्याख्यात्यांचे मार्गदर्शन सत्रही ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी उपस्थित युवकांना मुलाखतीचे तंत्र, आत्मविश्वास, माहिती व ज्ञान सादरीकरण पध्दत अशा विविध विषयांवर संवादी स्वरुपातील मार्गदर्शक सत्र आयोजित करण्यात आले होते.
या रोजगार मेळाव्यामध्ये रिलायन्स रिटेल, रिलायन्स एच.आर. सर्व्हिसेस, युरेका फोर्ब्स, टाटा लाईफ, आय.सी.आय.सी.आय., महिंद्रा हॉलीडेज ॲण्ड रिसॉर्ट्स, इलाईट सर्व्हिसेस, मॅक्स आर.ओ. सिस्टीम, राजलक्ष्मी सोल्युशन्स प्रा.लि., प्लॅटिनम कॉर्पोरेशन, एस.सी.एस. ब्रॉडबँड, सी.जी. कॉर्पोरेशन, विस्तार इंटरनॅशनल, जॉबबझ स्मार्ट, टाटा स्रटीव्ह, आयुष मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, केअर 24 हॉस्पिटल, स्टॅन्डर्ड स्प्रिंग अँड मेटल स्प्रेसिंग वर्क, स्टार्टोरीअल टेक्नॉलॉजीस, 360 डिजीटल हब, कोरियन्ट बिझनेस सोल्युशन अशा विविध क्षेत्रातील 65 नामांकित कंपन्या / व्यवसाय समुह या रोजगार मेळाव्यात सहभागी होते.
रोजगार मेळाव्यासाठी 2650 हून अधिक युवक, युवतींनी ऑनलाईन तसेच 600 हून अधिक युवकांनी मोबाईलवरून नोंदणी केली होती. त्याचप्रमाणे अनेक युवक, युवतींनी प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपली नोंदणी केली. अशाप्रकारे 4750 हून अधिक युवक युवतींनी या मेळाव्याचा लाभ घेतला. 700 हून अधिक युवक, युवतींना प्रत्यक्ष निवड नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आणि 800 हून अधिक तरूणांना दुस-या मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले आहे..
याशिवाय महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देणा-या संस्थांच्या माध्यमातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जात असून त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरूणाईला रोजगार उपलब्ध होण्यासोबतच रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्याचे कामही विशेषत्वाने केले जात आहे. नवी मुंबईतील युवक, युवतींचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे.