कणकवली शहरात जनसंघर्ष यात्रेचे दणदणीत स्वागत
असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
कणकवली : जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कणकवलीत लागलेले काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर काढण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला गेला. तुम्हाला रस्त्यावरचे झेंडे आणि बॅनर काढता येतील पण लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर कसे काढणार? असा खडा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.
जनसंघर्ष यात्रेच्या कणकवली येथील भरगच्च सभेत खा. चव्हाण यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता काँग्रेस सोडणा-यांवर सडकून टीका केली. कणकवलीत आजही काँग्रेसच्या झेंड्याखाली मोठी सभा होऊ शकते, ही बाब लोकांच्या मनात काँग्रेस किती खोलवर रुजलेली आहे याचे द्योतक आहे. या सभेचे नियोजन करणारे कार्यकर्ते बहाद्दर असून “ या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत.” कोकणातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आता नवे नेतृत्व घडविण्याची संधी चालत आल्याचे सांगून आगामी निवडणुकीत कार्यकर्ते सांगतील तो उमेदवार देऊ अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. कोकणातील दडपशाही संपवली नाही तर भविष्यात कदाचित मतदान करण्याची संधी नागरिकांना मिळणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसने कोकणात अनेकांना मोठे काम करण्याची संधी दिली पण त्यातील काही जणांनी पक्षाऐवजी केवळ स्वतःचाच विचार केला. अध्यक्ष एका पक्षाचे, खासदार दुस-या पक्षाचे आता निवडणूक कोणत्या पक्षातून लढणार त्यांचे त्यांनाच ठावूक असा बोचरा सवाल खा. अशोक चव्हाण यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम संदीप, आ. भाई जगताप, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास सावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार पी. एन, पाटील, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार विजय सावंत, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार सुभाष चव्हाण, माजी आमदार पुष्पसेन सावंत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, रामकिशन ओझा, प्रकाश सोनावणे, प्रदेश सचिव रामचंद्र दळवी, काका कुडाळकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, बाळा गावडे, महेंद्र सावंत यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारवर चौफेर हल्ला चढवला. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. शेतक-यांना कर्जमाफी मिळाली नाही लोकांना चारा छावण्यांची गरज आहे आणि या परिस्थितीत सरकार डान्सबार आणि लावण्या सुरु करण्याचे काम करत आहे. मागील तीन वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम रखडले आहे. इंदू मिलच्या जागेवर नियोजीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन स्वतः पंतप्रधानांनी केले होते. तरी आजवर ही स्मारके का उभी झाली नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली. आपले हे अपयश दडपण्यासाठी भाजप आता काँग्रेसवर खोटेनाटे आरोप करत आहे. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्यात यावी हा प्रस्तावच मुळात काँग्रेसने मांडलेला असताना काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती हा भाजपचा आरोप हास्यापद असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर आरोप करण्यापूर्वी मुंबई विकास आराखड्यातील भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर द्यावे असे प्रतिआव्हान त्यांनी दिले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी भाजप सेनेवर घणाघाती टीका केली. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने सोशल मिडीयाचा प्रचंड गैरवापर केला. आज तोच सोशल मिडीया भाजपच्या डोक्यावर पाय ठेवायला लागला आहे. सोशल मिडीयातून पोलखोल होत असल्याने त्यावर विश्वास ठेवू नका असे सांगण्याची नामुष्की भाजपावर ओढावली आहे. यामुळे घाबरून जाऊन सोशल मिडीयावर निर्बंध आणले जात आहेत. देशातील एकंदर परिस्थिती पाहता अघोषित आणीबाणीसारखी स्थिती आहे. रामाचे नाव घेऊन या पुढे आता भाजप सेनेची युती होईल. जे मंदिर बांधायला अयोध्येत गेले ते शरयू नदीची आरती करून परत आले. पंचवीस वर्ष यांनी रामाच्या नावाखाली देशाची फसवणूक केली आहे.
याच सभेत विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.