काँग्रेस मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मुंबई : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी नरेंद्र मोदी यांचे सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागणार आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन खा. चव्हाण म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचे सरकार संविधानाला पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने देशाचा कारभार करत आहे. संविधानीक संस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून सामाजिक वातावरण गढूळ करून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. दलित, अल्पसंख्यांकांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले असून संविधान वाचले तरच हा देश वाचेल. या सरकारच्या काळात संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने या लोकविरोधी भाजप शिवसेना सरकारविरुद्ध जनसंघर्ष सुरु केला आहे. राज्यभरात साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून काल भिवंडी येथे जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला पण संघर्ष थांबवलेला नाही. केंद्रातील आणि राज्यातील खोटारडे, हुकुमशाही वृत्तीचे सरकार घालवल्याशिवाय तो थांबणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
टिळक भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, खा. हुसेन दलवाई, आ. शरद रणपिसे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी खा. एकनाथ गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, प्रवक्ते सचिन सावंत, यशवंत हाप्पे, रमेश शेट्टी, राजन भोसले, राजेश शर्मा, पृथ्वीराज साठे, अभिजीत सपकाळ, सचिव शाह आलम शेख यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.