सुजित शिंदे
नवी मुंबई : दोनच दिवसापूर्वी सीवूडस रेल्वे स्टेशनमधील एल अॅण्ड टीचे सीवूड ग्रॅण्ड सेंटर मॉल येथे आग लागल्याचे प्रकरण आपणास माहिती आहेच. मुळातच मॉलच्या तळमजल्यावर कार्यालय चालविणे, गॅरेज उघडणे व अन्य दुकाने चालविणे असे प्रकार निदर्शनास आले आहे. मुळातच तळमजल्यावर पार्किगसाठी जागा आरक्षित असणे आवश्यक असताना कार्यालय चालविणे व त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार सतत ठेवणे हीच संतापजनक बाब आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्वच मॉलमध्ये तळमजल्यावर पार्कीगच्या ठिकाणी कार्यालय चालविले जात असताना या गैरप्रकाराविषयी पालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, यामुळे नवी मुंबईकरांमध्ये पालिका प्रशासनाप्रती प्रक्षोभ निर्माण झालेला असल्यामुळे मॉलमधील तळघरातील कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत विशेष मोहीम राबविण्याची मागणी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आपण स्वत: नवी मुंबईतील कार्यरत असणाऱ्या सर्व मॉलविषयी तातडीने पाहणी अभियान राबवावे. मॉलमध्ये तळमजल्यावर असणाऱ्या कार्यालयांना तात्काळ टाळे ठोकून त्या ठिकाणी केवळ वाहनांचीच पार्किग करण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत. या मॉलमध्ये असणाऱ्या तळमजल्यावर कार्यरत असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या जीवीताचे रक्षण कोण करणार? सध्या सर्वत्र बेरोजगारीचा भस्मासूर असताना मिळेल ती कामे मुले करत असतात. अल्प मजुरीत मिळेल ते काम करणारे कामगार उद्या मॉलमधील तळमजल्यावरील असुरक्षित वातावरणामुळे त्यांच्या जिविताचे बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी मॉलचालक व महापालिका प्रशासनच राहील. कामगारांच्या हिताचा विचार करता आपण शक्य तितक्या लवकर मॉलच्या तळमजल्यावर पाहणी अभियान राबविणे आवश्यक आहे. आग लागल्यावर आम्ही ग्रॅण्ड सेंटर मॉलची पाहणी केल्यावर आम्हाला तळमजल्यावरील कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांची असुरक्षितता निदर्शनास आली आहे. कामगारांच्या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी इंटकच्यावतीने आम्ही सर्वच मॉलमध्ये पाहणी अभियान राबवावे. नजीकच्या काळात मॉलमध्ये तळमजल्यावर दुर्घटना घडून कामगारांचा बळी गेल्यास अथवा जिवितास नुकसान झाल्यास तर आपणावर सदोष मनुष्यवधाचा इंटकच्या वतीने गुन्हा दाखल केला जाईल, या इशाऱ्याची आपण दखल घ्यावी. ज्यावेळी महापालिका प्रशासनाकडून मॉलच्या तळमजल्यावर पाहणी अभियान राबविताना कामगार संघटनांनाही त्यात सहभागी करून घ्यावे की जेणेकरून आम्हाला कामगारांच्या समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास आणून देणे शक्य होईल असे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.