राजेंद्र पाटील
पनवेल : पनवेल महापालिकेने हॉटेल मालवण तडकाला विद्रूप जाहिरातबाजी बद्दल चांगलाच तडाखा दिला असून अनधिकृत बॅनर लावून पनवेल शहराचे विद्रूपिकरण केल्याबद्दल हॉटेल मालवण तडकाला सहा लाख पंचाहत्तर हजार रुपये दंड सात दिवसात भरण्याची नोटिस बजावली आहे.
पनवेल महापालिकेने जाहिरात प्रसिध्द करणे आणि जाहिरात शुल्क ठरविणे याबाबत धोरण निश्चित करावे, या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकुर यांनी ओक्टोंबर 2017 मध्ये महापालिका सभागृहात प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार १३ जुलै २०१८ च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक १३ मंजूर केला आहे. पनवेल महापालिका हद्दीतील एस.टी.स्टँड समोरील डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूलाच्या खांबावर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे हॉटेल मालवण तडकाने जाहिरात लावून महाराष्ट्र विरूपण कायदा १९९५ चा भंग केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विरूपण कायदा १९९५ अंतर्गत व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलाम २४४ व २४५ अन्वये मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी २६ नोव्हेंबर २०१५ च्या आदेशान्वये अनधिकृत बॅनर, पोस्टर्स , फलक , डिजिटल फ्लेक्स , कमानी इत्यादि बाबत सार्वजनिक मालमत्ता विरूपण कायद्याची अमलबजावणी कठोरपणे करणेबाबत सूचित केले आहे. त्या अनुषंगाने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या अधिनियमाने जाहिरातीच्या क्षेत्रफळावर मंजूर दराच्या पाचपाट फी आकारण्याची तरतूद आहे.
हॉटेल मालवण तडकाच्या मालकांनी एक हजारफुट लांब आणि पाचशे फुट रुंद जाहिरात लावली असल्याने त्यांना ६ लाख ७५ हजार रुपये सात दिवसात महापालिकेत भरण्यास अथवा परवानगी प्राप्त कागदपत्रे दाखवून आपले म्हणणे सात दिवसात मांडण्यास सांगितले आहे. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी नोटिस उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.
* चौकट
मुंबई आणि नवी मुंबई महापालिकांपेक्षा पनवेल शहर स्वच्छ दिसले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी पुढाकार गेणे आवश्यक आहे. त्यामुळे अशी विद्रूप जाहिरात करून आपले शहर खराब करणार्याला पनवेलकर निश्चितच धडा शिकवतील त्याला सर्व नागरिकांनी साथ देणे आवश्यक आहे. ….. परेश ठाकुर, सभागृह नेते