राजेंद्र पाटील
नंदनवन कॉम्प्लेक्सच्या शेजारील मैदानावर आज निषेध सभा
पनवेल : डान्सबारवरील बंदी उठवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश समाजाला पुन्हा घातक ठरणार असल्याने राज्य सरकारने फेरविचार करून अध्यादेश काढावा. तसेच बंदी आदेश कायम करावेत, याकरीता आज, शनिवारी (ता. ०९) दुपारी २.३० वाजता नंदनवन कॉम्प्लेक्सच्या वाजूला (विजय सेल्स समोर) असलेल्या मैदानावर निषेध सभेचे आयोजन पनवेल संघर्ष समितीने केले आहे.
संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या निषेध सभेला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अभ्यासू आमदार विद्याताई चव्हाण, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई, माजी दिवगंत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेत्या कल्पना इनामदार आणि कर्जतचे आ. सुरेश लाड यांच्या कन्या ऍड. प्रतिक्षा लाड उपस्थित राहणार आहेत.
त्याशिवाय ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, साहित्यिक एल. बी. पाटील, शिवसेनेचे महानगर संघटक प्रथमेश सोमण, ज्येष्ठ सामाजिक नेते हरिष बेकावडे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सचिव नरेंद्र गायकवाड, मनसेचे शहरप्रमुख शितल शिलकर, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पाटील, भूमाता ब्रिगेडच्या नवी मुंबई अध्यक्ष राजश्री पाटील, स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष आर. डी. घरत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने डान्सबार बंदीविरोधात सर्व्वोच न्यायालयात पडती बाजू घेतल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबार विकृती फोफावणार आहे. त्याचा धोका ओळखून पनवेल संघर्ष समितीने डान्सबार बंदीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्रातून ही विकृती हद्दपार करण्याची मोहिम सुरू केली आहे. तिचाच एक भाग म्हणून उद्या, शनिवारी (ता. ०९) दुपारी २.३० वाजता निषेध सभेचे आयोजन केले असून त्या सभेचे महाराष्ट्रात निश्चितच सकारात्मक पडसाद उमटणार असल्याचा दावा कांतीलाल कडू यांनी व्यक्त केला आहे.
या निषेध सभेला समाजातील सर्वच घटकांनी त्यांच्या सहकार्यांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून योगदान देणे महत्वाचे असल्याचे कडू यांनी सांगून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.