मुंबई : शिवसेना हा जनसेवेला प्राधान्य देणारा पक्ष आहे. जनसेवा करण्यालाच शिवसेनेने प्राधान्य दिले आहे. शिवसेनेची कार्यालये सतत उघडी असतात. शाखेच्या माध्यमातून लोकांची कामे होतात. त्यातूनच संघटना वाढली आहे. संघटना बांधणीचे काम सतत सुरू असते. निवडणूका आल्यावर आम्ही संघटना बांधणी करत नाही. शेवटच्या मतदारांपर्यत पोहोचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असून शिवसेनेने कोणालाही गृहीत धरलेले नाही. शिवसेना मतदारांना आश्वासन नाही तर वचन देते आणि ते वचन पाळण्याचा प्रयत्न करते. शिवसेनेची कार्यालये बाराही महिने उघडी असतात, ती इतरांसारखी निवडणूकीसाठी उघडली जात नसल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केले आहे.
शिवसेना आपल्या नसानसात व श्वासाश्वासात भिनलेली असून १९७६ साली आपण शाखाप्रमुख होतो. त्यानंतर १९८६ साली ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचा नगरसेवक म्हणून गेलो. चार वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलो. स्थायी समिती सभापती, सभागृह नेता ही पदे वारंवार भूषविली आहेत. त्यानंतर उपजिल्हाप्रमुख व आता संघटनेत आपण जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असल्याचे गोपाळ लांडगे यांनी सांगितले.
मुंबई-ठाण्यात शिवसेनेचे संघटनात्मक कार्य जोरात असते. तिथे वेग असतो. त्या तूलनेत कल्याण कार्यक्षेत्रात वेगाने कार्य होत नाही. पण गेल्या काही वर्षात तेही चित्र बदलले आहे. शिवसेना संघटना फोफावत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारावर श्रध्दा व निष्ठा ठेवून आम्ही या ठिकाणी शिवसेना वाढवित आहोत. मुंबईतील घरामध्ये वाढत्या परिवाराला जागा पुरत नसल्याने तेथील शिवसैनिक निवासासाठी कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरपर्यत मोठ्या संख्येने विखुरला आहे. त्यांनी घर बदलले तरी शिवसेना पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे आता या भागात शिवसेना वाढीसाठी शिवसैनिकांचे जाळे उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी आता शिवसैनिकांची कमतरता नाही. संघटनेने माझ्यावर कधीही अन्याय केला नाही. चार वेळा नगरसेवक बनविले. महापौरपदाचे आरक्षण झाले नसते तर संघटनेने तेही दिले असते. विधानसभेची तिकीटही दिले. आता कल्याणची जबाबदारीही दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघ कळवा ते अंबरनाथपर्यत विखूरलेला असल्याने ठाणे व कल्याण फारसे वेगळे राहीले नसल्याचे गोपाळ लांडगे यांनी यावेळी सांगितले.
ठाण्यातील संघटना बांधणीच्या व चार वेळा नगरसेवक म्हणून काम केल्याच्या अनुभवाचा फायदा आपणास कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या महापालिका कार्यक्षेत्रात संघटनाबांधणी करताना फायदा झाला. मागच्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी आपली कोणतीही तयारी नव्हती. शिवसेनेने अचानक जबाबदारी सोपविली. कोणतीही पूर्वतयारी नव्हती. शिवसैनिकांनी निवडणूकीत अहोरात्र मेहनत केकली. अवघ्या १४ ते १५ दिवसात इतकी मजल मारली. अवघ्या ७०० मतांनी पराभूत झाल्यावर मागील साडे चार वर्षात लोकांशी संपर्क वाढविला. संघटनेच्या माध्यमातून त्यांची कामे केली. आता पक्षाने संधी दिल्यास आपण नक्कीच बाजी मारू याची आपणास खात्री आहे. निवडणूकीत युती करायची अथवा नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा उध्दव साहेबांचा आहे. शिवसैनिक या नात्याने आपण केवळ त्यांच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे गोपाळ लांडगे यांनी यावेळी सांगितले.
मनसेचे पूर्वी राज्यात १३ आमदार होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ नगरसेवक होते. आता कल्याण डोंबिवली महापालिकेत जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेचा या भागात पूर्वीसारखा प्रभाव राहिलेला नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विकासाचे जाळे गुंफले आहे. उद्या मनसेने कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत जावून येथून लोकसभा लढली तरी शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही. हिंदूत्वाला मानणारा वर्ग मग मनसेला कितपत सहकार्य करेल हाही प्रश्न आहे. दोन विरोधी टोकाची मंडळी एकत्र आल्यावर फारसे साधले जाईल याची शाश्वती नाही. आघाडीतील लोक किती एकदिलाने व एकजीवाने कितपत काम करतात यावरच त्यांचे यशापयश अवलंबून राहणार असल्याचे गोपाळ लांडगे यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना सत्तेत राहून विरोधात काम करत असल्याचे लांडगेंना विचारल्यावर त्यांनी मतदारांच्या मनात असा कोणताही संभ्रम नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या भूमिकेवर लोक खुश आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना सतत आवाज उठवित असल्याने लोक शिवसेनेसोबत आहेत. उध्दवसाहेब शांत नाहीत तर आक्रमक नेतृत्व आहे. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे ते वागत आहेत. शिवसेना आक्रमक असून शिवसैनिकही त्याच स्वरूपात काम करत आहेत. जशास तसे उत्तर देण्याची शिवसेनेची धमक आहे. सुरूवातीच्या काळात शिवसेना हा गुंडाचा पक्ष असल्याचा अपप्रचार विरोधकांनी केला. परंतु शिवसेना ८० टक्के समाजकारण करत असल्याचे लोकांनी जवळून पाहिल्यावर तेही शिवसेनामय झाले. शिवसेनेत आज परप्रातिंयही मोठ्या संख्येने जोडले गेले आहेत. शिवसेनेने निवडणूकीत जी वचने लोकांना दिली होती. परंतु सत्तेत असून भाजपने शिवसेनेला डावलल्यावर भाजपने लोकांमध्ये जावून त्यांचे प्रश्न मांडले. उल्हासनगरात शिवसेनेचे पूर्वी १७ नगरसेवक होते. आता २५ झाले आहेत. तिकीट वाटपात काही चुका झाल्याने सत्ता आली नाही. पराभवातून बोध घेवून तेथे संघटना नव्या जोमाने वाढत आहे. कल्याण-डोंबिवलीला मुंबई व ठाण्याच्या तुलनेत निधी नसल्याने विकासकामांना गती मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी मागील प्रचारसभेत येथे भाषण करताना या शहराच्या विकासासाठी ६५०० कोटी रूपये देण्याची घोषणा केली, पण आजपर्यत एक पैसाही दिला नसल्याचे गोपाळ लांडगे यांनी सांगितले.
साभार : नवराष्ट्र
शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांची नवराष्ट्रमधील मुलाखत नवी मुंबई लाईव्हच्या वाचकांंसाठी प्रसिध्द करत आहोत.
सुजित शिंदे : संपादक : संपर्क ९६१९१९७४४४