सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : ४ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सारसोळे खाडीमध्ये साजऱा होणाऱ्या बामणदेव भंडाऱ्यासाठी खाडीतील रस्त्याची साफसफाई करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन, कांदळवन विभाग आणि नवी मुंबईकरांच्या सहभागाने मंगळवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सारसोळे खाडीमध्ये बामणदेव मार्गावर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे सारसोळे ग्रामस्थांकडून याहीवर्षी बामणदेव भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बामणदेव हे खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाचे श्रध्दास्थान आहे. खाडीमध्ये मासेमारी करावयास गेल्यावर बामणदेवच आपले रक्षण करतो, अशी सारसोळेच्या ग्रामस्थांची भावना आहे. सारसोळे खाडीमध्ये बामणदेवाचे मंदिर असून महाशिवरात्रीच्या दिवशी सारसोळेचे ग्रामस्थ बामणदेवाचा भंडारा गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित करत असतात. बामणदेवाकडे जाणारा मार्ग आजही कच्चा व खाचखळग्यांचा आहे. पावसाळ्यात बामणदेवाच्या मार्गावर जंगली गवत वाढत असल्याने भंडाऱ्यापूर्वी सारसोळेच्या ग्रामस्थांकडून स्वखर्चाने या मार्गावर स्वच्छता अभियान राबविले जात आहे.
गेल्या वर्षीपासून या स्वच्छता अभियानात महापालिका प्रशासन व कांदळवन विभाग,, नगरसेवक, नगरसेविका, विवीद पक्षीय पदाधिकारी,, समाजसेवक, पत्रकार हेही ग्रामस्थांसमवेत या स्वच्छता अभियानात सहभागी होवू लागले आहेत. मंगळवारी, दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता या स्वच्छता अभियानास सुरूवात होणार असून नवी मुंबईकरांनी या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन मनोज मेहेर यांनी केले आहे.