१९ फेब्रुवारी, शासकीय शिवजंयती. महाराष्ट्रात वर्षानुवर्षे शिवजंयती ही तिथीनुसारच साजरी केली जात होती. शिवसेना या राजकीय संघटनेचा १९६६ साली महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उदय झाला व अल्पावधीतच ही संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फोफावली. नंतरत यथावकाश या शिवसेनेची पाळेमुळे देशातील अन्य राज्यातही विखुरली. शिवसेनेने प्रारंभापासूनच शिवछत्रपतीच्या नावाचाच आधार घेत संघटना वाढवली. जय महाराष्ट्रचा नारा देत जोडीला शिवछत्रपतींच्या नावाचा आधार घेत शिवसैनिक शिवजंयती जोरदारपणे साजरी करू लागले. शिवजंयती म्हणजेच शिवसेनेचाच उत्सव अशी धारणा यथावकाश महाराष्ट्रीयन मनामध्ये रूजली. या धारणेला कोठेतरी छेद देण्यासाठी व शिवजयंती उत्सवावर आपले प्रतिबिंब कोठेतरी उमटावे या हेतूने राज्यात काही वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने शिवजंयती तारखेनुसार साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्रात शिवजंयतीदेखील राजकीय सुंदोपसुंदीत विभागली गेली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस १९ फेब्रुवारीला तारखेनुसार शिवजंयती साजरी करत आहे तर शिवसेना-भाजपा आणि इतर हिंदूत्ववादी संघटना या तिथीनुसार शिवजंयती साजरी करू लागल्या.
नुकताच काश्मिर येथील पुलवामा या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करताना स्फोटांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या गाडीवर धडकवले. यातून झालेल्या स्फोटात भारतमातेचे ४२ जवान शहीद झाले. काश्मिरसारख्या अतीसंवेदनशील विभागात स्फोटाने भरलेले ट्रक पाकिस्तानचे दहशतवादी भारताच्या भूमीतून थेट जवानांच्या वाहनावर धडकविण्याचे धाडस दाखवितात, यातून अतीसंवेदनशील विभागातही भारताची सुरक्षा व्यवस्था किती तकलादू आहे, याचा जगाला पुन्हा एकवार प्रत्यय आला. अर्थात भारताच्या ढिसूळ सुरक्षा व्यवस्थेचे हे पहिलेच उदाहरण नाही. काही वर्षापूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने थेट देशाच्या आर्थिक राजधानीवर २६/११ हल्ला चढविताना भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे जगजाहिर झाले. मुळातच शिवछत्रपतीच्या मातीमध्ये, देशामध्ये सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघावेत ही लाजिरवाणी नाहीतर आपणा सर्वासाठी शरमेची बाब आहे. लाखापेक्षा अधिक सैन्य घेवून आलेल्या व पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून बसलेल्या शायिस्तेखानावर मूठभर सैन्य घेवून शिवछत्रपतींनी रात्रीच्या अंधारात मूठभर सैन्य घेवून हल्ला चढविला आणि शायिस्तेखानाची बोटे छाटली. जगातला हा पहिला सर्जिकल स्ट्राईक मानला जातो. शिवछत्रपतींनी सुमारे ३५० वर्षापूर्वी कोणताही गाजावाजा न करता महाराष्ट्राच्या भूमीवर घडवून आणला होता. सोळाव्या शतकामध्ये शिवछत्रपतींना सागरी मार्गावरील सुरक्षेचे महत्व समजले होते, ते आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर ६१ वर्षानंतरही समजू नये, याचाच अर्थ महाराष्ट्राला शिवछत्रपतींची रणनीती समजली नाही, उमजलीच नाही. शिवछत्रपतींच्या नावाचा केवळ राजकारणासाठीच वापर केला जात आहे. शिवजंयत्या साजऱ्या करण्यासाठीच वापर केला जात नाही. शिवछत्रपती महाराष्ट्राला समजले असते, देशाला उमजले असते, त्याच्या जीवनपटापासून बोध घेतला असता तर नक्कीच पुलवामासारख्या घटना, २६/११ सारख्या घटना घडविण्याचे धाडस पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी कधी केलेच नसते.
देशाच्या राजधानी दिल्लीपासून ते आथिक राजधानी मुंबईपर्यत व्याभिचाराच्या, अत्याचाराच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. आजही घडत आहेत. कोवळ्या मुलींपासून ते वृध्देपर्यत आज कोणीच आपल्या देशात सुरक्षित राहीलेल्या नाही. अल्पवयीन मुलींपासून ते वृध्देपर्यत सर्वांनाच अश्लिल नजरांचा सामना करावा लागत आहे. पोलिस ठाण्यात जितक्या व्याभिचारांच्या घटनांची नोंद होत आहे. त्याहीपेक्षा कैकपटीने व्याभिचाराच्या घटना पोलिसांच्या कागदोपत्री दाखलही होत नाहीत. या घटना नातेवाईकांनी अथवा परिचितांकडूनच झालेल्या असतात. संसार टिकविण्यासाठी अनेकदा महिला या घटनांची कोठेही वाच्यता करत नाहीत. त्यामुळेच आजवर अनेक कामांध विकृतींचे फावले आहे. परस्त्रींकडे पाहण्याचा व तिला सन्मानाने वागविण्याचा आदर्श शिवछत्रपतींने आपल्या जीवनपटामध्ये कृतीतून दाखविला. कल्याणच्या लढाईमध्ये लुटीच्या खजिन्यात चुकून आलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहून महाराजांनी तिला चोळीबांगडीचा आहेर करत तिची बोळवण केली होती. तिचे सौंदर्य पाहून शिवछत्रपती ‘अशीच आमुची माता सुंदर असती, तर आम्हीही सुंदर झालो असतो’ असे वदले असते.
आजची समाजव्यवस्था ही जातीव्यवस्थेमध्ये विभागली गेली आहे. आज आपण प्रगतपणाचा व वैचारिक प्रगल्भतेचा डांगोरा पिटत असलो तरी जातीभेदाचे भूत अजूनही आपल्या मानगुंटीवर बसलेले आहे. शिवछत्रपतींच्या सरदारांकडे नजर फिरविली असता सर्व जातीधर्मियांचा त्यात समावेश असलेला दिसून येतो. हे सर्व जातीधर्माचे लोक जातीधर्माच्या बेड्या तोडून केवळ स्वराज्य हाच श्वास घेवून वावरताना दिसायची. त्यामुळेच शिवछत्रपतींच्या स्वराज्याला सुराज्याचीही झालर होती. आज २१व्या शतकात मात्र स्वराज्याला सुराज्याची नाही तर भ्रष्टाचाराची, जातीभेदाची झालर असल्याचे दिसून येत आहे. देशातील न्यायालयात महिला अत्याचार व व्याभिचाराचेच खटले अधिक आहेत. अजूनही राम जन्मभूमीचा वाद सोडविण्यातच आम्ही धन्यता मानत आहोत. म्हणूनच शिवछत्रपती
आजही तुम्ही हवा होतात. या देशाला शिस्त लावण्यासाठी, सुधरवण्यासाठी आजही शिवछत्रपती तुमची गरज आहे. आपल्या देशात शिवछत्रपती कसे होते हे अभ्यासात शिकविले जाते, मुलेही मार्क मिळविण्याइतपतच शिवछत्रपतींचा परिचय करून घेतात. शिवछत्रपतींचा आदर्श घेण्यास, त्यांच्या विचारांचे , कार्याचे अनुकरण करण्यास कोणालाही वेळ नाही. कोणत्याही राजकारण्याला सुराज्य यावे असे मनापासून वाटत नाही. शिवछत्रपतींना स्वराज्य सहजासहजी निर्माण करता आले नाही, त्यासाठी सतत संघर्ष करावा लागला. त्याग करावा लागला. पण आज शिवछत्रपतींचे नाव घेवून राज्य कारभाराचा गाढा हाकणाऱ्यांची परिश्रम करण्याची, संघर्ष करण्याची, त्याग करण्याची तयारी नाही. सर्वाना आज शॉटकट हवा आहे. त्यामुळे जीवनाचाच शॉटकट’ झाला आहे. समाजव्यवस्थेचेच मातेरे होवू लागले आहे. दहशतवादी अतीसंवेदनशील विभागात येवून जवानांना शहीद करू लागले आहेत. शिवछत्रपतींच्या नावाचा गजर आता केवळ जंयतीमहोत्सवात आणि शासकीय योजनांना नाव देण्याइतपतच सिमित राहीलेला आहे. हे चित्र बदलणार कधी? सध्याचे चित्र पाहता नजीकच्या काळात सूतरामही शक्यता नाही. म्हणूनच शिवछत्रपती याही काळात तुमची खरोखरीच गरज आहे,. राजे आज तुम्ही हवा होतात…
:- संदीप खांडगेपाटील
(साभार : दै. नवराष्ट्र)