अॅड, महेश जाधव
कल्याण : उन्हाळ्याचे दिवस सुरू होण्यास आठवडाच उरला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात दुष्काळामुळे आताच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. शुक्रवारी उल्हासनगरमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया जाण्याची घटना घडली आहे. उल्हासनगर येथील भरतनगर परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण काम वेगाने सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. यामुळे आधीच पाणीटंचाईने ग्रासलेल्या लोकांना दुष्काळात तेरावा महिना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. अचानक फुटलेल्या जलवाहिनीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. एमआयडीसी मार्फत रस्त्याचे खोदकाम होत असताना अनेकदा जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
उल्हासनगर – ४ येथील सिमेंट काँक्रीटकरण रस्त्याच्या कामात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्याठिकाणी होत आहे. याशिवाय जवळपास हजाराहून अधिक नागरीकांनी घेतलेल्या नळजोडण्या या रस्त्याच्या कामामुळे तुटल्या गेल्याने त्यातून देखील मोठयाप्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. सकाळ संध्याकाळ फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी वाहत असल्यामुळे भरतनगर परिसरात तलावाचे स्वरूप निर्माण झाले. याशिवाय फुटलेल्या जलवाहिनीतून माती आणि इतर सांडपाणी जात असल्यामुळे परिसरातील नागरीकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याचे खोदकाम करताना कोणतीही दक्षता घेतली जात नसल्यामुळे ती पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्या गेल्याने होणाऱ्या लाखो लिटर पाण्याच्या नासाडीकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष केले जात आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी थांबविण्यासाठी नागरीकांनी प्लास्टिक लावून पाण्याची गळती थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत.