मुंबई : माझ्या हाती एकहाती सत्ता द्या मी चमत्कार घडवून दाखवेन असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केलं आहे. पुण्यातील कोंढवा भागात एका कार्यक्रमाला राज ठाकरेंनी हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यासाठी त्यांनी महापालिकेचंही उदाहरण दिलं. पुणे महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत. इथेही बदल घडवायचा असेल तर ते तुमच्या हाती आहे. मला एकहाती सत्ता द्या आणि मग बघा मी कसा चमत्कार घडवतो. निवडणुका जवळ आल्या आहेत माझा तोफखाना तयार आहे. मी फक्त आचारसंहितेची वाट बघतो आहे. निवडणुका लागल्या की पुण्यात येईन ज्यांची फाडायची त्यांची फाडेनच असाही इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
ई-शाळा प्रकल्पाच्या उद्घाटनाला राज ठाकरेंनी पुण्यात हजेरी लावली होती. याचवेळी थोडक्यात त्यांनी त्यांचे विचार मांडले. महाराष्ट्रात बदल घडवायचा असेल तर एकहाती सत्ता द्या अशी मागणी राज ठाकरेंनी याआधीही केली आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी याच मागणीचा पुनरुच्चार केला. पुणे महापालिकेत मनसेचे १६२ नगरसेवक निवडून आल्यावर चमत्कार घडेल मात्र तो घडवणं तुमच्या हातात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय भूमिका घेणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. इतकेच नाही तर राष्ट्रवादीसोबत ते जाणार का याचीही चर्चा रंगली आहे. निवडणुकांच्या तोंडावर काय होणार हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. असं असलं तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय करणार हे स्पष्ट झालेले नाही. अजित पवार यांनीही राज ठाकरेंना महाआघाडीसोबत येण्याची ऑफर दिली आहे. अशात राज ठाकरे यांनी मात्र काहीही प्रतिसाद दिलेला नाही. एकीकडे शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली आहे. आता राज ठाकरे काय करणार हे स्पष्ट व्हायचे आहे.