स्वंयम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : लोकसभा निवडणू,कांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे पहावयास मिळत आहे. लोकसभेची जागा आपली असो वा मित्र पक्षाची असो, ती जागा जिंकून केंद्रात मोदींचे पुन्हा एकवार हात बळकट करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबई कार्यक्षेत्रात भाजपने २४ फेब्रुवारी ते ३ मार्चदऱम्यान भाजपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती नवी मुंबई भाजपचे सरचिटणिस विजय घाटे यांनी दिली.
लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तुर्भे येथे आयोजित केलेल्या विशेष सभेमध्ये भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना भाजपच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे व भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी निवडणूक मार्गदर्शन केले. या बैठकीत केंद्रात व राज्यात भाजप सरकारने सत्ता राबविताना केलेल्या विविध लोकोपयोगी कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष घरत व आमदार मंदा म्हात्रे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी ‘बुथ जिंकाल तर निवडणूक जिंकाल’ हा संदेश देतानाच पक्षाच्या राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारिणीने दिलेले कार्यक्रम नवी मुंबईत बुथ स्तरावर नेण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आल्याची माहिती विजय घाटे यांनी दिली.
२४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम वॉर्ड व मंडळ अधिकारी अधिकाधिक मतदारांना एकत्रित करून त्यांच्यापर्यत पोहोचविणार आहेत. २५ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ ते ८ या वेळेत कोपरखैराणेतील शेतकरी समाज हॉलमध्ये ऐरोली विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यासह सर्व आघाड्याचे जिल्हा पदाधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थितांना माजी आमदार प्रवीण दरेकर मार्गदर्शन करणार आहेत. २६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील प्रभागाप्रभागात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ‘कमल ज्योती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वत:च्या घराबाहेर तसेच प्रभागातील सार्वजनिक ठिकाणी कमळाची रांगोळी काढून त्यावर दीपप्रज्वलित केली जाणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी एलईडी स्क्रीन लावून बुथप्रमुख अथवा कार्यकर्ते त्यांच्याशी सुसंवाद साधू शकतील अशा प्रकारचे नियोजन करण्यात येणार आहे. २ मार्च रोजी बेलापुर विधानसभा क्षेत्रातील बुथप्रमुख व केंद्र शक्तीप्रमुख यांचा बेलापूर विधानसभा मतदारसंघात मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासही प्रवीण दरेकर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती विजय घाटे यांनी दिली.
३ मार्च रोजी नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर विधानसभा क्षेत्रामध्ये मोटरसायकल रॅली दुपारी ४ वाजता काढण्यात येणार आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मोटरसायकलस्वार हे दिघा येथून निघून वाशीतील शिवाजी चौकात पोहोचतील. बेलापुर विधानसभा कार्यक्षेत्रात बेलापूरहून मोटरसायकलस्वार निघून ते वाशीतील शिवाजी चौकात पोहोचतील. सांयकाळी ६ वाजता दोन्ही विधानसभा मतदारसंघातील मोटरसायकलस्वार वाशीतील शिवाजी चौकात पोहोचणार असल्याची माहिती विजय घाटे यांनी दिली.
आठवडाभर भाजपकडून पक्षसंघटनात्मक पातळीवर विविध कार्यक्रम राबवून जनसामान्यांपर्यत पोहोचण्याचा हा प्रयत्न असून यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतही नवा उत्साह निर्माण होईल. लोकसभा निवडणूकीत भाजप व मित्र पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी भाजपचे हे अभियान उपयूक्त ठरणार असल्याचा विश्वास यावेळी विजय घाटे यांनी बोलून दाखविला.